आपला महाराष्ट्रक्राईमठळक बातम्याव्हिडिओ

Jalgaon Crime : शिंदे गटाच्या आमदाराच्या समर्थकांकडून पत्रकाराला भर रस्त्यात मारहाण

जळगाव : जळगावमधून (Jalgaon Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी स्थानिक पत्रकाराला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप काही दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. या प्रकाराने (Jalgaon Crime) संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. ज्या पत्रकाराला आमदारांनी शिवीगाळ केली होती, त्याच पत्रकाराला भर रस्त्यात मारहाण करण्यात आली आहे. सध्या या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. स्थानिक पत्रकार संदीप महाजन यांना ही मारहाण करण्यात आली आहे. आमदार किशोर पाटील समर्थकांनी ही मारहाण केल्याचा आरोप संदीप महाजन यांनी केला आहे.

नेमकं प्रकरण काय?
जळगाव जिल्हा सध्या एका अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणावरुन हादरला आहे. या प्रकरणावरुन स्थानिक पत्रकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाष्य करणारी बातमी केली. ही बातमी किशोर पाटील यांना चांगलीच झोंबली. किशोर पाटील यांनी पत्रकार महाजन यांना फोन करून अश्लील शिवीगाळ केली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांच्या समर्थकांकडून आज पत्रकार महाजन यांना मारहाणही करण्यात आली.

दरम्यान (Jalgaon Crime) मारहाणीनंतर पत्रकार संदीप महाजन यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यादरम्यान पत्रकार संदीप महाजन म्हणाले कि, “आधी मला शिव्या दिल्या गेल्या. आता मला मारहाण झाली आहे. याआधाही माझ्या जीवाला आमदारांपासून आणि त्यांच्या कार्यकर्त्यांपासून धोका असल्याचं मी म्हणाले होतो. मात्र माझ्या मागणीनंतरही पोलिसांनी मला संरक्षण दिलं नाही. आताही मला आणि माझ्या कुटुंबाला असुरक्षित वाटतंय. मला व माझ्या कुटुंबाला काही झालं तर त्याला जबाबदार आमदार किशोर पाटील आणि पोलीस प्रशासन राहील” असे म्हणाले आहेत.