आपला महाराष्ट्रक्राईमपुणे

Pune Crime News : विहिरीमध्ये पडलेल्या ‘त्या’ 4 मजुरांचे मृतदेह सापडले

पुणे : पुण्यातील (Pune Crime News) इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी या ठिकाणी 120 फुट खोल विहिरीमध्ये पडलेल्या चारही मजुरांचे मृतदेह आज शुक्रवारी दुपारी सव्वा बारा वाजेपर्यंत सापडले. हे 4 मजूर बेलवाडी गावातील आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे (Pune Crime News) बेलवाडी गावावरती शोककळा पसरली आहे. म्हसोबाचीवाडी येथे विहिरीला रिंग (सिमेंटक्रॉक्रिटीकरण चा कठडा) तयार करण्याचे काम गेल्या तीन-चार महिन्यापासुन सुरु होते. यासाठी बेलवाडी गावातील दहा ते बारा मजूर एका ठेकेदाराकडे रोजंदारीवरती काम करीत होते.

ही घटना मंगळवारी घडली आहे. त्या दिवशी पोर्णिमा असल्यामुळे बहुतांश कामगार देवदर्शनासाठी गोंदावले येथे गेल होते. सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (वय 32), जावेद अकबर मुलाणी ( वय 30, मूळ रा.बेलवाडी, हल्ली रा. निंबोडी), परशुराम बनसीलाल चव्हाण (वय 30), लक्ष्मण उर्फ मनोहर मारुती सावंत (वय 55) हे चौघेजण सकाळी लवकर कामावरती गेले. दुपारनंतर विहिरीच्या रिंगचे काम करीत असताना अचानक मुरुम व मातीचा ढिगारा कोसळल्याने 4 मजूर विहिरीमध्ये कोसळले.त्यांच्या अंगावरती मुरुम व माती पडल्याने ढिगाऱ्याखाली गाडले गेले.

चार दिवसामध्ये पोकलेन मशिनच्या साहय्याने विहिरीच्या परीसरातील माती व मुरुम हटवली. विहिरीतील पाणी व मलबा हटविल्यानंतर 4 मजुरांचे मृतदेह एनडीआरएफच्या जवानांनी बाहेर काढले. हे चार मजूर एकाच गावातील असल्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.