जळगाव : जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon Crime) भडगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा खून करून तिचा मृतदेह गोठ्यात गुरांच्या चाऱ्यामधून लपवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील (Jalgaon Crime) नराधम आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील (वय-19) असे आरोपीचे नाव आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
भडगाव तालुक्यातील एका गावात सात वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्याला होती. 30 जुलै रोजी पिडीत मुलगी दुपारी घरी एकटी असताना गावात राहणारा स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील याने पिडीत मुलीला गुरांच्या गोठ्यात बोलावून घेतले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने घरच्यांना हा प्रकार सांगेन असे सांगितले. यानंतर स्वप्निल पाटील याने मुलीसोबत जबरदस्ती केली, यात मुलीसोबत त्याची झटापट झाली. यादरम्यान स्वप्निलने दोनवेळा मुलीच्या डोक्यात गोठ्यात पडलेला दगड मारला. याबद्दल कुणालाही संशय अथवा घटनेची माहिती मिळू नये म्हणून स्वप्निलने मुलीचा मृतदेह गोठ्यात असलेल्या गुरांच्या चाऱ्यामध्ये लपवून ठेवला.
आपली मुलगी बराच वेळ न दिसल्याने घरच्यांनी सगळीकडे शोधाशोध केली मात्र तिचा कुठेच पत्ता लागला नाही. यानंतर तिच्या पालकांनी पोलीस स्टेशनला आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार भडगाव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन दिवसांपासून मृतदेह कडब्याच्या कुट्टीत असल्याने त्यातून दुर्गंधी येवू लागली. गुरांच्या चाऱ्यामध्ये अल्पवयीन मुलीचा मृतदेह संशयास्पद आढळून आल्याने खळबळ उडाली होती. ज्या कडब्याच्या कुट्टीत मृतदेह मिळाला तो गोठा स्वप्नील विनोद पाटील (वय 19, रा. गोंडगाव ता. भडगाव) याचा असल्याने पोलिसांचा त्याच्यावर संशय आला. यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा मान्य केला.
स्वप्नील विनोद पाटील याला अटक केली असून त्याची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान गुरुवारी सायंकाळी संशयित याला 55 ते 60 पोलीस बंदोबस्तात घटनास्थळाच्या पडताळणी जात गोंडगाव येथे नेत असताना ग्रामस्थांनी गोंधळ घातला. यात संशयिताला ताब्यात घेण्यावरुन पोलीस आणि जमावात झालेल्या वादातून पोलिसांच्या वाहनावर झालेल्या दगडफेकीत 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले तसेच वाहनाचेही मोठे नुकसान झाले.