बुलढाणा : समृद्धी महामार्गावरील अपघाताचे (Samruddhi Mahamarg Accident) सत्र काही थांबायचे नाव घेईना. आज पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग लागली. या आगीमध्ये संपूर्ण ट्रक जळून खाक झाला आहे. यामुळं समृद्धी महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरजवळ घडली. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
काय घडले नेमके?
समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg Accident) मेहकर नजीक धानोरा राजनी गावाजवळ मध्यरात्री एका बर्निंग ट्रकचा थरार बघायला मिळाला. नाशिकहून नागपूर येथे केमिकल घेऊन जाणाऱ्या एका ट्रकचा सुरुवातीला टायर फुटला आणि त्यानंतर हा ट्रक साईड बॅरियरला धडकला. त्यानंतर या ट्रकला आग लागली. ही आग एवढी भीषण होती की, अग्निशमन दलाच्या चार बंबांना देखील ही आग आटोक्यात आणण्यासाठी जवळपास चार तास लागले. यामध्ये ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. सुदैवाने या अपघातातून चालक आणि वाहक सुखरूप बचावले आहेत.