पुणे : मागच्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. टोमॅटोचा दर प्रति किलो दीडशे रुपयांच्या वर गेला होता. काही ठिकाणी तर टोमॅटो 300 रुपये किलोने विकले जात होते. एका बाजूला टोमॅटोचे दर गगनाला भिडले असताना दुसरीकडे मात्र पुण्यातून दिलासादायक बातमी समोर येत आहे. घाऊक मार्केटमध्ये टोमॅटोचे दर प्रति किलोमागे वीस रुपयांनी कमी झाले आहेत. पुणे मार्केट यार्डमध्ये काल-परवापर्यंत टोमॅटोला प्रति किलोमागे 100 रुपयांपेक्षा अधिक दर मिळत होता. मात्र आज टोमॅटोचे दर हे प्रति किलो 80 ते 90 रुपयांवर आले आहेत.
किरकोळ बाजारात दर कायम
घाऊक बाजारात टोमॅटोचे दर कमी झाले असले तरी देखील अद्याप किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर कमी होताना दिसत नाही आहे. पुण्यातील किरकोळ मार्केटमध्ये टोमॅटोला प्रति किलो 120 ते 140 रुपये एवढा दर मिळत आहे. टोमॅटोची आवक पाहता पुढील काही दिवसांत टोमॅटोचे भाव कमी होण्याची शक्यता आहे.