मुंबई : आता अवघ्या दोन महिन्यांवर गणेशोत्सव येऊन ठेपलाय. प्लास्टर ऑफ पॅरिस पासून तयार केलेल्या गणेशमूर्तींवर बंदी असल्याने नागरिकांनी पर्यावरण पूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा, असं आवाहन महापालिका प्रशासनाने केलं आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मूर्ती विसर्जनाबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने पीओपीच्या मूर्तींवर बंदी संदर्भात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेनेही पीओपीच्या मूर्ती उत्पादनावर बंदी घालण्याचा आदेश काढला आहे. तसच पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी मूर्ती बनवणारे कारागीर आणि उत्पादक यांच्यासाठी मार्गदर्शक तत्त्वं जाहीर केली आहेत.
काय आहेत ही तत्वे ?
पारंपरिक शाडू माती वापरून बनवलेल्या कच्च्या मालापासून मूर्ती तयार करावी.
मूर्तीसाठी प्लास्टर ऑफ पॅरिस, प्लास्टिक आणि थर्माकोल यांचा वापर करू नये.
मूर्तीचे दागिने वाळलेल्या फुलांचे घटक, पेंढा इत्यादींचा वापर करावा.
मूर्ती आकर्षक बनवण्यासाठी झाडांची नैसर्गिक उत्पादनं रेझीन्सचा चमकदार सामग्री म्हणून वापर करावा
मूर्ती रंगवण्यासाठी रासायनिक रंग, ऑईल पेंट्स, इनॅमल आणि कृत्रिम रंगावर आधारित पेंट्सचा वापर करू नये
नैसर्गिक साहित्य आणि रंग वापरून बनवलेले आणि काढता येण्याजोगे, धुण्यायोग्य सजावटीचे कपडे वापरावेत
मूर्ती रंगवण्यासाठी नैसर्गिकरित्या वनस्पतींपासून तयार होणारे रंग खनिज किंवा रंगीत खडक अशा नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या रंगाचा वापर करावा
नागरिकांनी मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करणारे गणेश मूर्तिकार, कारागीर, उत्पादक किंवा व्यावसायिक यांच्याकडून मूर्ती खरेदी करावी, तसच येणारा गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा करावा असं आवाहन महापालिकेने केलं आहे.