नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 2022-23 या आर्थिक वर्षाचे आयकर विवरण दाखल (ITR) करण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत आहे. आयकर खात्याकडून विवरण दाखल (ITR) करण्याबाबतचे एसएमएस करदात्यांना येत आहेत. करदात्यांनी लवकरात लवकर आयकर विवरण दाखल करणं आवश्यक आहे. मुदतीनंतर दाखल केल्यास दंड भरावा लागू शकतो. यावर्षी आयकर विवरण भरताना दोन कररचना विचारात घेऊनच त्यावर निर्णय घ्यावा.
विवरण भरताना करदात्यांना (ITR) काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. छोटीशी चूक महागात पडू शकते आणि ती दुरुस्त करण्यासाठी बराच त्रास सहन करावा लागतो. परदेशात बँक खाते असल्यास त्याची माहिती देणं आवश्यक आहे. याशिवाय परदेशात शेअर्स किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक असल्यास आयटीआर मध्ये त्याबाबत माहिती द्यायला हवी. करदात्यांना परदेशातील संपत्तीचीही माहिती देणं आवश्यक आहे. आयकर भरताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.
Pan Aadhaar Link : पॅन-आधार कार्ड लिंक न केल्यास करदात्यांना भरावा लागणार आता ‘एवढा’ दंड
काय घ्याल काळजी ?
योग्य आयटीआर अर्ज निवडा
आयकर विभागाने अनेक अर्ज दिलेले आहेत. करदात्यांना आपले उत्पन्नाचे स्रोत विचारात घेऊन योग्य अर्ज निवडला पाहिजे. तसं न केल्यास आयकर विभागाकडून तुमचं विवरण फेटाळलं जाऊ शकतं.
उत्पन्नाची खरी माहिती द्या
विवरण भरताना उत्पन्नाची खरी माहिती द्यावी. चुकीने किंवा हेतूपरस्पर उत्पन्नाच्या स्त्रोतांबाबतची खरी माहिती न दिल्यास आयकर विभागाकडून नोटीस दिली जाऊ शकते. बचत खात्यातील व्याज, घरभाड्यातून प्राप्त होणारे उत्पन्न ही माहिती द्यावी लागते.
जुन्या आणि नव्या कररचनेतून योग्य पर्याय निवडा
करदात्यांना विवरण भरताना दोन पर्याय दिले आहेत. विवरण भरताना उत्पन्न, कर सवलती आणि एकूण भराव्या लागणाऱ्या कराची तुलना करून योग्य पर्याय निवडावा.
बँक खात्याचा तपशील आवश्यक
अनेक जण आपल्या सर्व बँक खात्यांची माहिती देत नाहीत. अशा खात्यांमध्ये झालेल्या आर्थिक व्यवहारांची तसच मिळणाऱ्या व्याजाची माहिती दिली जात नाही. ही त्रुटी लक्षात आल्यास नोटीस दिली जाऊ शकते.
आयटीआरचे व्हेरिफिकेशन करा
अनेक जण आयटीआर भरल्यानंतर व्हेरिफिकेशन करत नाही. मात्र व्हेरिफिकेशन करणं आवश्यक आहे. त्यानंतरच आयकर खाते तुमच्या विवरणावर पुढील कारवाई करते. व्हेरिफिकेशन साठी ई – व्हेरिफायची सुविधा आहे.
अर्थकारण : मृतकाचा ITR कोणी भरायचा ? वाचा सविस्तर माहिती
मिळालेल्या भेटवस्तूंची माहिती गरजेची
सणासुदीला किंवा इतर कारणांनी जवळचे नातेवाईक महागड्या भेटवस्तू देतात. मात्र आयकर नियमानुसार एका वर्षात 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेची भेटवस्तू मिळाली असल्यास त्यावर कर द्यावा लागतो. आयटीआर भरताना याची माहिती देणं आवश्यक आहे.
करदात्यांनी (ITR) फॉर्म 26AS डाऊनलोड करावा आणि विविध व्यवहार, उत्पन्न इत्यादींवर कापण्यात आलेल्या कराची माहिती पडताळून घ्यावी. नोकरदार वर्गाला फॉर्म 16/ 16 A यांचीही पडताळणी करून बघण्यास सांगण्यात येते. तसं केल्यास विवरण भरताना चूक होणार नाही.