भारतीय स्त्रियांच्या वेशभूषेत साडीला (Saree Blouse) विशेष महत्त्व आहे. पाश्चात्य वेशभूषा कितीही हवीशी वाटली तरी सणासुदीला, कार्यक्रमाला साडीला प्राधान्य दिलं जातं कारण साडीबद्दल प्रत्येक मुलीला विशेष प्रेम असतं. फक्त काळानुसार त्यात बदल झाले आहेत. पारंपरिक आणि आधुनिकतेची सांगड घालून साडीला फ्युजन टच दिला आहे.वर्षभर साड्यांचे विविध प्रकार येत असतात.पण हल्ली साड्यांबरोबरच ब्लाऊजचे विविध नवनवीन पॅटर्न बघायला मिळत आहेत.आजकाल साडी कोणतीही असेल तरी चालते,पण ब्लाऊजच्या (Saree Blouse) पॅटर्नकडे विशेष लक्ष दिले जाते.
साडी (Saree Blouse) हा पारंपरिक पोशाख असला तरी सध्या साडी नेसण्याच्या विविध पद्धती आणि ब्लाऊजचे हटके प्रकार यामुळे इंडो-वेस्टर्न लुक बघायला मिळतो.हल्ली तरुणी एम्ब्रॉयडरी, पॅचवर्क असलेल्या ब्लाऊजबरोबरच स्टँड कॉलर, हायनेक,थ्री -फोर्थ,फुल स्लीव्हज यालाही पसंती देताना दिसतात.याशिवाय रफल,बेल स्लीव्हज,बलून स्टाइल,ऑफ शोल्डर,कोल्ड शोल्डर, टॉप स्टाइल याची तरुणींमध्ये क्रेझ आहे.सध्या तयार ब्लाऊजही उत्तम फ़िटिंगमध्ये मिळतात.त्यामुळे तयार ब्लाऊज घेण्याकडेही महिलांचा कल वाढला आहे. ब्लाऊजच्या अशा विविध प्रकारांमुळे सुंदर कॅज्युअल लुक मिळतो.ब्लाऊजच्या विविध पॅटर्नविषयी थोडक्यात पाहू…
1) रफल स्लीव्हज-
सध्या तरुणींमध्ये रफल स्लीव्हजचा ट्रेंड चर्चेत आहे.९०च्या दशकात हा ट्रेंड होता.आता पुन्हा ही फॅशन आली आहे. डिझाइनर साडीवर रफल पॅटर्नचे ब्लाऊज उठून दिसतात.यामुळे एक वेगळा आणि रेट्रो लूक दिसतो.या पॅटर्नमध्ये सगळे रंग छान दिसतात.प्रिंटेड साडी आणि प्लेन रफल ब्लाऊज मुळे क्लासी लूक दिसतो.
2) कोल्ड शोल्डर-
कोल्ड शोल्डरची सध्या फॅशन आहे.टॉप,कुर्ते, ड्रेसच नाही तर ब्लाऊजमध्ये ही कोल्ड शोल्डरची क्रेझ आहे.या पॅटर्नचे ब्लाऊज साडीबरोबर घागऱ्यावरही छान दिसतात.यात प्लेन ,एम्ब्रॉयडरी असे दोन्ही प्रकार उठून दिसतात.प्लेन साडीवर नक्षीकाम, पॅचवर्क केलेले ब्लाऊज आणि डिझाइनर साडीवर प्लेन कोल्ड शोल्डर ब्लाऊजने हटके लूक येतो.पारंपरिक काठपदराच्या साड्यांवरही कोल्ड शोल्डर ब्लाऊजने वेगळा लूक दिसतो. हल्ली सिरीयल,चित्रपटातही कोल्ड शोल्डरची फॅशन आहे.
3) थ्री- फोर्थ स्लीव्हज-
हल्ली पुन्हा थ्री-फोर्थ स्लीव्हजची फॅशन आली आहे. विद्या बालन,रेखा यांच्यामुळे थ्री-फोर्थ ब्लाऊजची फॅशन लोकप्रिय आहे. साऊथ इंडियन मोठ्या काठपदराच्या साड्यांवर मोठ्या काठाचे कोपऱ्यापर्यंतचे हात शिवण्याकडे मुलींचा कल आहे.ही फॅशन जुनी असली तरी सोनेरी रंगाच्या आकर्षक रंगामुळे हे ब्लाऊज उठून दिसतात.पारंपरिक लूकसाठी हे ब्लाऊज छान दिसतात. थ्री-फोर्थ स्लीव्हज प्रमाणे फुल स्लीव्हज शिवण्याचा ही ट्रेंड आहे.डिझाइनर साड्यांसाठी नेट,प्रिंटेड नेट,वेलव्हेटचा ब्लाऊजसाठी वापर केला जातो. याशिवाय थ्री-फोर्थ मध्ये बलून स्टाइलचे ब्लाऊजही बघायला मिळतात.
4) स्टँड कॉलर-
मध्यंतरी बॅकलेस ,डीप नेक,हॉस्टर बॅक ओपन,स्लीव्हलेस अशा विविध पॅटर्नची चलती होती.सध्या या पॅटर्नबरोबरच स्टँड कॉलर,सूट कॉलर,बंद गळ्याचे ब्लाऊज शिवण्याची फॅशन आहे.कॉटन,शिफॉनच्या साड्यांवर स्टँड कॉलरचे ब्लाऊज उठावदार दिसतात.साडी प्लेन असेल तर ब्लाऊजवर एम्ब्रॉयडरी केलेली असते. कॉलरवर, हातांवर डिझाईन असते.साडीवर डिझाईन असेल तर कॉन्ट्रास्ट कलरच प्लेन ब्लाऊज छान दिसतं. सूट कॉलर शिवण्याचाही सध्या ट्रेंड आहे.
5) टॉप स्टाइल ब्लाऊज-
हल्ली टॉप पॅटर्न ब्लाऊज, केप ब्लाऊजचाही ट्रेंड आहे.स्कर्टवर खरेदी केलेला एखादा टॉप ब्लाऊज म्हणून वापरू शकतो. फ्रील, क्रॉप टॉप,वर्क असलेले टॉप ब्लाऊज म्हणून घातले जातात.वेस्टर्न लूकसाठी हे ब्लाऊज उठून दिसतात.सिल्क,सॅटिन, शिफॉनच्या साड्यांवर हे ब्लाऊज खूप छान दिसतात.
6) केप ब्लाऊज
केप ब्लाऊज हाही एक प्रकार सध्या फॅशनमध्ये आहे.शॉर्ट कुर्त्याएवढं हे ब्लाऊज साडीला एक नवा लूक देतो.इंडो-वेस्टर्न स्टाइलसाठी ब्लाऊजचे हे विविध पॅटर्न सौंदर्यात भर घालतात. या नवीन पॅटर्नबरोबर नक्षीकाम केलेले, पॅचवर्क,हेवी वर्क असलेले ,बोट नेक,ऑफ शोल्डर ब्लाऊजचीही क्रेझ आहे.पारंपरिक आणि आधुनिक टच देण्यासाठी ब्लाऊजचे हे प्रकार नक्कीच छान आहेत.
(रिपोर्टर बागेश्री पारनेरकर)