Chandrapur Accsident

भावाच्या अ‍ॅडमिशनसाठी जाताना बहिणीचा वाटेत दुर्दैवी मृत्यू; बापाच्या डोळ्यादेखत सोडला जीव

14589 0

चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये भावाच्या अ‍ॅडमिशनसाठी जाताना बहिणीचा वाटेत मृत्यू झाला आहे. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील एका कुटुंबाच्या बाबतीत ही घटना घडली आहे. मुलाने नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्याच्या भवितव्यासाठी चांगल्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी बी.एस.सी द्वितीय वर्षाला शिक्षण घेणारी मुलगी आणि वडील दुचाकीने निघाले. मात्र,वाटेतच काळाने त्यांचा घात केला.

काय घडले नेमके?
बल्लारपूर – चंद्रपूर मार्गावरील सन्मित्र सैनिक शाळेजवळ एका वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून जबरदस्त धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती कि, मुलगी जागीच ठार, तर वडील गंभीर जखमी झाले. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृत विद्यार्थिनीचे नाव वेदांती युवराज चिंचोलकर (वय 21) असं आहे तर जखमी वडिलांचे नाव युवराज माधव चिंचोलकर असे आहे.

घटनेच्या वेळी वेदांती आणि तिचे वडील युवराज चिंचोलकर हे दुचाकी एमएच 34 बीएन 5848 क्रमांकाच्या वाहनाने बल्लारपूर – चंद्रपूर मार्गावरील सन्मित्र सैनिक शाळेत कुणालच्या अकरावीच्या प्रवेशासाठी गेले. तेथील काम आटोपून राज्य महामार्गाने चंद्रपूरकडे परत येत होते. यादरम्यान एका अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यानंतर वेदांती आणि वडील रस्त्यावर कोसळले. दुचाकी फरफटत काही अंतरावर गेली. अर्ध्या तासाने रुग्णवाहिका आली. रुग्णवाहिकेतून वेदांती आणि तिच्या वडिलांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी वेदांतीला मृत घोषित केले. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News
error: Content is protected !!