मुंबई : 16 जून रोजी बहुचर्चित ‘आदिपुरुष’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून तो खूप चर्चेत होता. या चित्रपटाचा टीझर व ट्रेलर आल्यानंतर आदिपुरुष चित्रपटातील VFX देखील खूप चर्चेत होते. या चित्रपटातील VFX वर प्रेक्षकांनी जोरदार टीका केली आहे. या चित्रपटातील व्हिज्युअल इफेक्ट्सचे सुपरव्हायजर कोण आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? त्यांचे नाव आहे प्रसाद सुतार. चला तर मग प्रसाद सुतार यांच्याबद्दल जाणून घेऊया….
आदिपुरुषचे VFX सुपरव्हायजर प्रसाद सुतार कोण आहेत?
प्रसाद सुतार हे दिग्गज व्हिज्युअल इफेक्ट सुपरव्हायजर आहेत, त्यांनी तान्हाजी, बाजीराव मस्तानी, डॉन 2 आणि राजनीती यासारख्या चित्रपटांसाठी काम केलं आहे. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात 1998 साली आलेल्या गुलाम चित्रपटातून केली होती. त्या चित्रपटात आमीर खान चालत्या ट्रेनसमोर उडी मारतानाचा सीन ज्या टीमने तयार केला होता, त्या टीममध्ये प्रसाद सुतार होते. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात CGI अॅनिमेटर म्हणून केली. कंपोझिटर आणि VFX सुपरव्हायजर म्हणून काम केल्यानंतर आणि शेवटी VFX डिपार्टमेंटचे प्रमुख म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. त्यांनी आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत विविध भाषांमधील जवळपास 150 चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
आदिपुरुषच्या VFX वर टीका झाल्यानंतर प्रसाद सुतार यांनी दिली प्रतिक्रिया
सुतार यांनी चित्रपटाच्या व्हिज्युअल इफेक्ट्सच्या ट्रोलिंगबद्दल नुकतेच भाष्य केले आहे. “आम्ही गोष्टी पूर्णपणे बदलू शकत नाही. ट्रोलिंगनंतर अॅनिमेशनमधील पात्रं पुन्हा दुरुस्त करणं, हे आव्हान होतं. आम्ही ते छान केलंय. आम्हाला मिळालेल्या कमी वेळेत आम्ही गोष्टी सुधारण्यासाठी काम केलं. आम्ही ते अधिक रिअल बनवत आहोत,” असं ते म्हणाले.