जाफराबाद : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (LokSabha Elections) अनुषंगाने सोमवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) आढावा बैठक पार पडली. या बैठकीमध्ये जाफराबादच्या (Jaffrabad) नगराध्यक्षा. डॉ. सुरेखा लहाने (Dr. Surekha Lahane) यांनी त्यांच्यावर झालेल्या राजकीय आरोपांचा पाढा वाचत असताना त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी त्यांना बळ देण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार (Sharad Pawar) थेट जाफराबादमध्ये दाखल झाले. यामुळे कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही.
काय आहे नेमके प्रकरण?
जाफराबादच्या नगराध्यक्षा. डॉ. सुरेखा लहाने यांच्यावर काही दिवसांपूर्वी विविध आरोप करीत अविश्वास ठराव दाखल झाला होता. यावरून चांगलेच रणकंद माजले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार चौकशी अहवाल नगरविकास खात्याकडे पाठविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी पुण्यात खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत लोकसभेच्या अनुषंगाने बैठक झाली होती. या बैठकीत सुरेखा लहाने या भावुक झाल्या. या सगळ्या प्रकरणाची माहिती मिळताच खा. पवार यांनी जाफराबाद शहर गाठून पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण कार्यकर्त्यांच्या पाठिशी ठाम असल्याची ग्वाही दिली. यावेळी या कार्यक्रमाला आ.राजेश टोपे, आ. सतीश चव्हाण, माजी आ. चंद्रकांत दानवे, अरविंद चव्हाण, माजी खा. जयसिंग गायकवाड, माजी आ.संजय वाघाचौरे, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष निसार देशमुख उपस्थित होते.
चांगले काम करणाऱ्यांना जनतेची साथ मिळते
जाफराबादेत जनतेने राष्ट्रवादीच्या बाजूने निर्णय दिला आहे. परंतु, विरोधकांकडून सत्तेचा आणि पैशाचा दुरूपयोग या ठिकाणी होताना दिसत आहे. नगराध्यक्षा डॉ.सुरेखा लहाने उत्तम काम करत असताना त्याठिकाणी फोडाफोडीचे राजकारण केले जात आहे. आम्ही अनेक वर्ष सत्तेत होतो. मात्र सत्ता आम्ही अंगात येऊ दिली नाही. सत्ता येते जाते. मात्र चांगले काम करणाऱ्यांना जनतेची साथ मिळते. याचा विचार करून कार्यकर्त्यांनी काम करीत रहावे, असा सल्ला खा. पवार यांनी यावेळी दिला.
राज्यातील सत्ताधाऱ्यांना घाबरणार नाही
नगरपंचायतीच्या माध्यमातून काम करत असताना कितीही दबाव आला तरी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करत राहणार आहे. राज्यातील सत्तधारी पक्षाने नगरसेवकांना हाताशी धरून सुरू केलेल्या राजकारणाला आपण घाबरत नसल्याचे नगराध्यक्षा डॉ. सुरेखा लहाने यांनी यावेळी सांगितले.