छत्रपती संभाजीनगर : राज्यात अपघाताचे प्रमाण काही थांबायचं नाव घेईना. छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) अशीच एक अपघाताची (Accident) घटना घडली आहे. यामध्ये आई – वडिलांनी आपल्या मुलाच्या डोळ्यादेखत आपला प्राण सोडला आहे. वैजापूर तालुक्यातील चोरवाघलगाव परिसरात कार आणि बसचा भीषण अपघात झाला. ही बस वैजापूरकडून जात होती तर छत्रपती संभाजीनगरकडून अपघातग्रस्त कार येत होती. या दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पती-पत्नीचा मृत्यू
ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. वैजापूरकडून जाणारी बस आणि छत्रपती संभाजीनगरकडून येणारी कार यांच्यामध्ये समोरासमोर जोरदार धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातामध्ये पती, पत्नीचा जागीचा मृत्यू झाला आहे. हंसराज पवार (Hansraj Pawar) आणि सुलोचना पवार (Sulochana Pawar) अशी मृत पती- पत्नींची नावे आहेत.
तसेच या अपघातात मुलगा मनोज पवार आणि सून माया पवार हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे पवार कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.