Wrestler Protest

संपादकीय : भय इथले संपत नाही ! महिला कुस्तीपटूंना न्याय मिळणार का?

477 0

आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे आहेत असं म्हणताना कोणत्याही क्षेत्रात महिला सुरक्षित नाही हे सुध्दा वास्तव आहे. हे असं म्हणण्याचं कारण म्हणजे महिला कुस्तीगीरांच होणारं शोषण …अतिशय संतापजनक…आणि खेदजनक… विशेष म्हणजे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर महिला खेळाडूंनी लैंगिक शोषणाचे आरोप करून त्यांना पदावरून हटवावं, त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी जानेवारी महिन्यापासून नवी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आंदोलन छेडलं आहे.

ऑलिम्पिक मेडलचे दावेदार असणाऱ्या महिला कुस्तीपटुंना व्यवस्थेविरुद्ध रस्त्यावर येऊन ‘कुस्ती खेळावी लागतेय, ही बाब देशासाठी, खेळासाठी खूप लांच्छनास्पद आहे. आघाडीची मल्ल विनेश फोगट, साक्षी मलिक सह बजरंग पुनिया, रवी दहिया यांच्यासारख्या जवळपास 30 मल्लांनी भारतीय कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. भारताची आघाडीची मल्ल विनेश फोगटने तर लखनऊ कुस्ती शिबिरात महिला मल्लांच लैंगिक शोषण झाल्याचा थेट आरोप केला..हे प्रकरण आताच नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय महिला कुस्तीगीरांना लैंगिक अत्याचाराला सामोरं जावं लागत आहे. आणि याची साधी दखलही घेतली जाऊ नये हे दुर्दैव.

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मल्लांनी आंदोलन सुरू केल्यान जगभरात हा विषय चर्चेचा ठरला. आंतरराष्ट्रीय पातळीवर या प्रकारामुळे भारताची प्रतिमा डागाळलीच पण या प्रकरणाची दखल घेतली गेली नाही तर याचे पडसाद क्रीडाविश्वात उमटतील. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या महिला खेळाडूंना लैंगिक अत्याचाराविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करूनही न्याय मिळत नसेल तर सामान्य महिलांना न्याय कसा मिळू शकेल ही शंका एक मुलगी म्हणून अस्वस्थ करणारी आहे. ब्रिजभूषण सिंह गुन्हेगार आहेत की नाही हा नंतरचा मुद्दा पण अल्पवयीन मुलीने लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्याचा आरोप केला असताना आणि पोक्सो अंतर्गत कारवाई होणं अपेक्षित असताना आजपर्यंत त्यांच्यावर कारवाई का झाली नाही? शासन इतकं थंड का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. लैंगिक अत्याचार, बलात्कार झाल्यानंतर आपल्याकडे कँडल मार्च काढले जातात, निषेध नोंदवला जातो पण यामुळे असे प्रकार थांबत नाही. उलट रोज अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

या प्रकरणात तर महिला खेळाडूंना न्यायासाठी रस्त्यावर उतरावं लागलं, मिळालेली पदकं विसर्जित केली पण यावर कोणीही काही बोलायला तयार नाही. या शोषित महिला खेळाडूंना न्याय मिळणार का? या प्रश्नाचं उत्तर मात्र अनुत्तरीत आहे. सत्ताधारी यावर काही बोलायला तयार नाही तर विरोधक याकडे एक राजकीय हत्यार म्हणून पाहत आहेत. खर म्हणजे या प्रकरणाला राजकीय मुद्दा बनवण्यापेक्षा समाजातील एक गंभीर मुडा म्हणून याकडे पाहिलं पाहिजे. अत्याचार करणारा कोणत्या पक्षाचा यापेक्षा ती वृत्ती ठेचली पाहिजे. या प्रकरणाची गंभीर दखल घेतली गेली नाही तर येणाऱ्या काळात भीतीमुळे महिला खेळाडू तयारच होणार नाहीत.

 

बागेश्री पारनेरकर (रिपोर्टर)

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide