Gopal Italiya

2 जून रोजी पुण्यात आदमी पार्टीची स्वराज्य यात्रा व विराट जनसभा

738 0

पुणे : शुक्रवार दिनांक 2 जून रोजी आम आदमी पार्टीचे स्वराज्य यात्रा पुण्यामध्ये दाखल होत असून सायंकाळी 4 वाजता आझम कॅम्पस पुना कॉलेज येथून रॅलीची सुरुवात होणार आहे तर सायंकाळी 6 वाजता सणस ग्राउंड शेजारी जाहीर सभा होणार आहे. आज आम आदमी पार्टी तर्फे पुण्यात पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेला आम आदमी पार्टीचे पुणे शहर उपाध्यक्ष डॉ अभिजीत मोरे, एकनाथ ढोले, किशोर मुजुमदार, गणेश ढमाले, आनंद अंकुश, सचिव सुजित अग्रवाल, मीडिया प्रमुख अमित म्हस्के, प्रवक्ता धनंजय बेनकर हे यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्रामध्ये स्वराज्य यात्रेची सुरुवात 28 मे रोजी भक्ती स्थळ पंढरपूर येथे विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाने होऊन 6 जून राज्याभिषेक दिनी शक्तिस्थळ रायगड येथे यात्रेची सांगता होणार आहे. स्वराज्य यात्रा ही 8 जिल्ह्यात सुमारे 800 किलोमीटर अंतर पार करत गावागावातून, खेड्यातून, वाड्या वस्त्यावरून जात नागरिकांचे लक्ष वेधत आहे. दिल्ली व पंजाब मधील सरकारने केलेल्या मोफत शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी, महिलांना मोफत बस प्रवास अशा असंख्य कामाची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवत आहे. यासाठी नागरिकांनी यात्रेमध्ये मोठा सहभाग नोंदविला व जनसभेमध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली.

पक्षाचे राष्ट्रीय सह-सचिव व प्रदेश सह-प्रभारी युवा नेते गोपाल इटालिया ज्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला गुजरातमध्ये 13 टक्के मतदान मिळवत आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला. याच गोपाल इटालिया यांच्या मार्गदर्शनामुळे संपूर्ण आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण झाली आहे. येत्या 2 जूनला सायंकाळी 4 वाजता पुण्यामध्ये ही यात्रा आझम कॅम्पस – लक्ष्मी रोड – अलका चौक – टिळक रोड – सणस मैदान अशी भव्य स्वराज्य यात्रा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता सणस ग्राउंड शेजारी भव्य जाहीर जनसभा होणार आहे.

पुणे महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टी करिष्मा करेल असे अंदाज पुणेकर नागरिक यानिमित्ताने बांधत आहेत. मागील विधानसभा निवडणुकीनंतर विविध राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या पद्धतीने युत्या करत सत्ता काबीज करण्याचे प्रयत्न केले. या सर्वच प्रस्थापित पक्षांची विश्वासार्हता संपली असल्यामुळेच महाराष्ट्रातील जनता नवीन पर्याय शोधत आहे. पुणे महानगरपालिकामध्ये आम आदमी पार्टी विजय कुंभार यांच्या नेतृत्वाखाली काम की राजनीती करणारी पार्टी असेल व पुणेकरांसमोर एक नवा पर्याय म्हणून येत्या निवडणुकात सिद्ध करेल.

एकीकडे वाढती महागाई असताना शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, कामगारांचे, महिलांचे, नोकरीचे प्रश्न तसेच शाळा फी, दवाखाने आदी प्रश्नाबाबत प्रस्थापित विरोधी पक्ष सुद्धा आवाज उठवण्यास तयार नाहीत. अशा वेळेस सामान्य जनतेचा आवाज आम आदमी पार्टी असेल. या सभेसाठी पक्षाचे राष्ट्रीय सह-सचिव व महाराष्ट्र राज्य सहप्रभारी गोपाल इटालिया यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या सभेसाठी नागरिकांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आम आदमी पार्टीचे पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी केले आहे.

Share This News
error: Content is protected !!