अकोला : अकोल्यामध्ये (Akola) एक विचित्र घटना घडली आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील शेगाव बाळापुर रस्त्यावर एका खासगी बस चालकाकडून शेगाव आगाराच्या (Shegaon Agar) एसटी (ST) बस चालकाला मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीप्रकरणी बाळापुर पोलिसांत (Balapur Police) गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. दरम्यान शेगाव आगारातून यवतमाळला जाण्यासाठी निघालेल्या शेगाव आगाराच्या बस चालकाला साईड देण्याच्या कारणावरून खामगाव येथील स्वामी ट्रॅव्हल्सच्या (Swami Travels) खासगी बस चालकाने बेदम मारहाण केली. सध्या या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आगाराची एसटी बस ही प्रवासी भरून यवतमाळकडे निघाली होती. ही बस चालक योगेश गोंडोकार आणि वाहक दीपक चिकडे हे दोघे घेऊन जात होते. दरम्यान, शेगाव बाळापुर मार्गाने जात असताना लक्झरी बस चालक हा महामंडळाच्या एसटी बसला हटकून पुढे जाण्यासाठी साईड देत नव्हता. काही वेळानंतर लक्झरी बसमधील प्रवासी रस्त्यात जवळा फाट्यावर थांबली अन् प्रवाशी उतरविण्यासाठी बस थांबल्याने एसटी चालकानं आपली बस पुढे काढली.
खासगी बसचालकाकडून एसटी बस चालकाला मारहाण (Video) pic.twitter.com/SsBXdgWN0K
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) May 21, 2023
यानंतर लक्झरी बस चालकाने आपल्या बसचा वेग वाढवत एसटी बसला ओव्हरटेक करत बस थांबवली. एसटी बस चालकाला म्हणाला की “बस पुढे का नेली?”, असे म्हणत एसटी चालकाशी वाद घालायला सुरुवात केली. यानंतर या वादाचे हाणामारीत रूपांतर झाले. या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी लक्झरी बस चालकावर आणि वाहकावर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.