पिंपरी- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जावयाचा भाऊ आणि व्याह्यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जावयाचा भाऊ रोहित शंकर काळभोर आणि व्याही शंकर नामदेव काळभोर अशी या प्रकरणातील आरोपींचे नावे आहेत. न्यायालयाच्या आदेशावरून दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पवन मनोहरलाल लोढा यांनी फिर्याद दिली आहे.
रोहित काळभोर आणि शंकर काळभोर यांनी मनोहरलाल लोढा यांच्या कंपनीचे बनावट सही, शिक्के तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन मनोहरलाल लोढा यांची खराबवाडी, चाकण या ठिकाणी एक्सा एलाईज नावची कंपनी आहे. या कंपनीला रोहित काळभोर आणि नामदेव काळभोर यांची कोहिनूर ट्रेंड होम ही कंपनी भंगार मालाचा पुरवठा करत होती. भंगार मालाचा पुरवठा करण्याच्या मोबदल्यात रोहित काळभोर आणि शंकर काळभोर यांनी पवन मनोहरलाल लोढा यांच्या एक्सा एलाईज कंपनीकडून जवळपास 78 लाख रुपयांचे काही अग्रिम चेक घेतले होते.
मात्र पवन मनोहरलाल लोढा यांच्या कंपनीच्या सहमती शिवाय रोहित काळभोर आणि शंकर काळभोर यांनी ते अग्रीम घेतलेले चेक बँकेत वटविण्यास लावले होते. मात्र, पवन मनोहरलाल लोढा यांनी बँकेकडे वेळीच तक्रार दाखल केल्याने ते चेक जमा होऊ शकले नाही. या प्रकरणात पवन मनोहरलाल लोढा यांनी न्यायालयात केलेल्या तक्रारीवरून पिंपरी पोलिसांनी अधिक तपास करून रोहित काळभोर आणि शंकर काळभोर विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
 
                         
                                 
                             
                             
                             
                            