छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. खासगी शिकवणी संपवून आईसोबत घरी निघालेल्या बालवाडीच्या चिमुकलीला अपघातामध्ये (Accident) आपला जीव गमवावा लागला आहे. रस्ता ओलांडताना भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला तर तिची आई या अपघातात गंभीर जखमी झाली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास आंबेडकरनगर भागातील जळगाव रस्त्यावर घडली आहे.
अन्वी प्रताप मोरे (वय 5 वर्षे, रा. फुलेनगर, आंबेडकर) (Anvi Pratap More) असे या अपघातात मृत पावलेल्या चिमुकलीचे नाव आहे. तर शिला प्रताप मोरे (Sheila Pratap More) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. अन्वी ही बालवाडीत शिकत होती, ती एका खाजगी शिकवणीला जात असे. दुपारी 12 वाजता शिकवणी संपल्यानंतर ती आपल्या आईसोबत घरी परतत होती. यावेळी रस्ता ओलांडताना भरधाव वेगात आलेल्या दुचाकी (एम. एच. 15 जेबी.8956) चालकाने दोघी मायलेकींना उडविले.
ही धडक एवढी भीषण होती की यामध्ये अन्वी गंभीर जखमी झाली. तर तिची आई शिला या किरकोळ जखमी झाल्या. अन्वी व शिला यांना बेशुध्दावस्थेत स्वतः दुचाकी चालकानेच घाटी रूग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अन्वी हिला तपासून मृत घोषित केले. तर शिला मोरे यांच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी प्रताप मोरे (Pratap More) यांच्या फिर्यादीवरून दुचाकी चालक ललीत सातोदकर (रा. येवला जि. नाशिक)(Lalit Satodkar) याच्याविरूध्द सिडको पोलिस ठाण्यात (CIDCO Police Station) गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला. सहाय्यक फौजदार विठ्ठल काकडे (Assistant Faujdar Vitthal Kakde) या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.