accident

देवीच्या दर्शनाहून परतत असताना कुटुंबावर काळाचा घाला; 4 जणांचा जागीच मृत्यू

12412 0

सांगली : आज सकाळी सांगलीमध्ये खासगी ट्रॅव्हल्स आणि कारचा भीषण अपघात झाला. विटा नेवरी रोडवर हा भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता कि या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्व कुटुंब देवीचं दर्शन घेऊन आपल्या घरी परतत होते. यामध्ये कार चालकाला डुलकी लागल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

काय घडले नेमके?
अपघातग्रस्त ट्रॅव्हल विट्याहून साताऱ्याला जात होती. तर कार साताऱ्याहून विट्याच्या दिशेने येत होती. यावेळी कार भरधाव वेगात होती. यादरम्यान अचानक कार चालकाला झोप लागली अन् त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हा भीषण अपघात झाला. शिवाजी नगरच्या पुढे विटा महाबळेश्वर राज्य मार्गावर हा भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता कि यामध्ये तासगाव तालुक्यातील गवाण येथील काशीद कुटुंब ठार झालं. मृत व्यक्तींमध्ये एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश होता.

या भीषण अपघातात चंद्रकांत काशीद, त्यांची पत्नी सुनीता काशीद आणि मेव्हणा अशोक यांच्यासह कारचालक जागीच ठार झाले. तर सदानंद काशीद यांनी एअरबॅग उघडल्यामुळे थोडक्यात बचावले आहेत. या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. तसेच या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या अपघातानंतर घटनस्थळी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

 

Share This News
error: Content is protected !!