महाराष्ट्र भूषण सोहळ्यात नेमकं काय घडले ? तापमान नेमकं किती होते ?

1739 0

ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कारा’ने रविवारी खारघरच्या सेंट्रल पार्कवर गौरविण्यात आले. मात्र, या भव्य कार्यक्रमात ११ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. या घटनेमुळे शिंदे सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. मात्र तापमान नेमके किती होते याची माहिती समोर आली आहे.

अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ प्रदान करतानाचे क्षण अनुभवता यावेत, यासाठी राज्यभरातून त्यांचे तब्बल २५ लाख भाविक खारघरच्या सेंट्रल पार्कवर जमले होते. या कार्यक्रमासाठी मोठी गर्दी जमवण्यात आली असली तरी येथील नियोजन अत्यंत ढिसाळ होते. मैदानाभोवती मेडिकल बुथ होते, पण उष्णतेमुळे प्रकृती बिघडलेल्या लोकांची संख्या खूपच जास्त होती. कार्यक्रमाची वेळ सकाळी १० वाजताची होती, परंतु हा कार्यक्रम दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहिला. त्यामुळे सामान्य अनुयायांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागला.

हवामान विभागाच्या माहितीनुसार नवी मुंबईमध्ये रविवारी ३७ अंश सेल्सिअस तापमान होते. हवेत आर्द्रताही अधिक होती. अनुयायांना पाच तास उन्हात बसावे लागले. लाखोंचा जनसागर एकत्र आल्याने उष्णता आणि आर्द्रता वाढली. यामुळे शेकडो अनुयायांना त्रास झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. खुद्द अमित शहा यांनी आपल्या भाषणात तापमान ४२ अंशांच्या आसपास असल्याचा उल्लेख केला होता. इतक्या उष्ण तापमानात सामान्य अनुयायी रणरणत्या उन्हात डोक्यावर कोणतेही छप्पर नसताना तासनतास बसून राहिले. या सगळ्यांना वेळेत पाणी आणि वैद्यकीय सुविधा न मिळाल्यामुळे दुर्दैवी प्रकार घडला, असे सांगितले जात आहे.

आयोजकांचे चुकलेच- अजित पवार

खरंतर कार्यक्रमाची वेळ उन्हाळ्यात भर दुपारची निवडणं हेच आयोजकांचं चुकलेलं आहे. आपल्यातले निष्पाप लोक मृत्यूमुखी पडले आहेत. त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही डॉक्टरांना सांगितलंय की औषधपाण्याचा खर्च त्यांच्याकडून घेऊ नका. मुख्यमंत्र्यांनीही तो खर्च करणार असं सांगितलं आहे”, अशा शब्दांत अजित पवारांनी कार्यक्रमाच्या वेळेवर आक्षेप घेतला आहे. सर्वात आधी जखमींवर व्यवस्थित उपचार आणि मृतांवर व्यवस्थित अंत्यसंस्कार या गोष्टी पार पडायला हव्यात, त्यानंतर यात कोण दोषी होतं वगैरे तपासता येईल, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

Share This News
error: Content is protected !!