अण्णा हजारे यांना जीवे मारणार ! कुटुंबावर अन्याय झाल्याने शेतकऱ्याचा इशारा

866 0

शेतीच्या वादातून अन्याय झाल्याचे कारण देत एका शेतकऱ्याने थेट ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची १ मे रोजी हत्या करण्याची धमकी दिली आहे. या शेतकऱ्याने या बाबतचा एक व्हिडिओ देखील प्रसारित केला आहे. पोलिसांनी या प्रकारची तातडीने दखल घेतली आहे.

याबाबतची माहिती अशी की, श्रीरामपूर तालुक्यातल्या निपाणी वडगाव इथल्या संतोष गायधने यांनी शेतीच्या वादातून संगनमताने कुटुंबावर अन्याय झाल्याचा आरोप केलाय. व्हिडीओमध्ये गायधने यांनी शेतीच्या वारस नोंदीमध्ये अन्याय झाल्याचे म्हटले आहे. शेतीच्या वादातून गटातील ९६ जणांनी कुटुंबावर दबाव आणला असून खोट्या केस दाखल करून भीती दाखवण्यात येत आहे. आपल्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न झाला असेही गायधने याने म्हटले आहे.

माझे कुटुंब भीतीच्या सावटाखाली जगत असून यासंदर्भात अण्णा हजारेंसह वरिष्ठ पोलीस आणि मंत्र्यांनाही निवेदन दिले आहे. पण तरीही कारवाई होत नाही. यामुळे राष्ट्रपतींकडे आत्महत्येसाठी परवानगी मागितली असल्याचे संतोष गायधने यांनी म्हटले आहे. अण्णा हजारे हे या प्रकरणात मॅनेज झाले असल्याचा आरोप गायधने यांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकाराची दखल घेत चौकशी सुरू केली आहे.

Share This News
error: Content is protected !!