Breaking News

उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला, या भेटीबाबत अमित शाहांचा शेलारांना फोन

669 0

शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी काल मंगळवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. या भेटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्याशी संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे.

अमित शाह यांनी काल महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला आहे. चंद्रशेखर बावणकुळे आणि आशिष शेलार या दोन्ही नेत्यानी अमित शाह यांना राज्यातील राजकीय परिस्थितीची संपूर्ण माहिती दिल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान काल उद्धव ठाकरे यांनी रात्री शरद पवार यांची सिल्वर ओकवर भेट घेतली. त्यांच्यासोबत शिवसेना नेते संजय राऊत देखील होते. ही भेट राजकीय दृष्ट्या महत्वाची समजली जात आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये सव्वा तास चर्चा झाली.

अदानी प्रकरणामध्ये जेपीसीची (JPC) गरज नसल्याचं शरद पवार यांचे विधान, पण काँग्रेस आणि शिवसेनेकडून जेपीसीची मागणी, तसंच सावरकरांच्या मुद्यावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र तर राहुल गांधी यांचे सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान, राहुल गांधींसमोरच विरोधकांच्या बैठकीत शरद पवारांची नाराजी, ईव्हीएमच्या मुद्यावरुन उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचे एकमत तर अजित पवारांची मात्र ईव्हीएमला पाठराखण.  अशा परस्पर विरोधी भूमिकांमुळे महाविकास आघाडीमध्ये आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीत समन्वय टिकून राहावा, मतभेद उघडपणे समोर येऊ नयेत, या विषयावर ही बैठक झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्या दृष्टीने डॅमेज कंट्रोल करण्यासाठीच ही बैठक झाल्याचे मानण्यात येत आहे.

Share This News
error: Content is protected !!