Breaking News

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा; ईडीच्या आरोपपत्रात अजित पवारांचं नावच नाही

526 0

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीनं (ED) एक आरोपपत्र दाखल केले आहे. या घोटाळ्यात एका कंपनीचेही नाव होते. ही कंपनी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित आहे. मात्र आरोपपत्रात अजित आणि सुनेत्रा पवारांचं नाव नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अजित पवारांना ईडीकडून क्लीन चिट मिळाली की काय अशी चर्चा आहे.

जुलै 2021 मध्ये ईडीने या प्रकरणात 2010 मध्ये जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची एकूण 65 कोटी रुपयांची जमीन, इमारत आणि साहित्य यासह मालमत्ता जप्त केल्या होत्या. ईडीने त्या वेळी हे स्पष्ट केले होते की, ही संपत्ती सध्या गुरू कमोडिटी सर्व्हिसेसच्या नावावर आहे आणि जरंडेश्वर शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेडला लीजवर आहे. या कारखान्याचा लिलाव कमी किंमतीत झाल्याचा आरोप देखील ईडीने केला आहे.

या घोटाळ्यात स्पार्कलिंग सॉइल लिमिटेड या कंपनीचं नाव आलं होतं. जरंडेश्वर शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेडचे ​​बहुतांश शेअर्स स्पार्कलिंग सॉईल प्रायव्हेट लिमिटेडकडे आहेत. ही कंपनी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असल्याचं सांगितलं जात होतं. पण ईडीने या प्रकरणी अजित पवार यांची एकदाही चौकशी केली नाही. अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना साधं समन्सही बजावलं नाही. आता ईडीने स्पार्कलिंग सॉइल कंपनीला आरोपी बनवलं आहे. या कंपनीविरोधात ईडीने पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. पण अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांचा या आरोपपत्रात साधा उल्लेखही नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. न्यायालयाने अद्याप या प्रकरणाची दखल घेतली नसून पुढील सुनावणी 19 एप्रिल रोजी होणार आहे.

Share This News
error: Content is protected !!