हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील श्रीनगर भागातील एका घरावर पोलिसांनी छापा टाकून घरात सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीस वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याचे उघडकीस आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे एका माजी महिला पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
वसमत शहरातील श्रीनगर कॉलनीतील एका महिलेच्या घरी वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना लागली. या माहितीच्या आधारे वसमत शहर पोलिसांनी बुधवारी दुपारी छापा मारला. या छाप्यात एका अल्पवयीन मुलीस तिच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन देहविक्रीचा व्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याचे उघडकीस आले आहे. सदर महिलेने आपल्या घरात वेश्याव्यवसाय करण्यासाठी जागा दिली होती. या गुन्ह्यामध्ये एका माजी महिला पोलीस कर्मचाऱ्याचा देखील सहभाग असल्याचे तपास उघड झाले आहे.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राहुल महिपाळे यांनी तक्रार दिली. या तक्रारीवरून वैभव अवचित चौरे (रा. पिंपळा चौरे,तालुका वसमत) व श्रीनगर भागातील रहिवासी महिला अशा दोघांविरोधात पॉक्स आणि पीटा एक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम हे करीत आहेत. यामधील अल्पवयीन मुलीला बालसुधारगृहात पाठवण्यात आले.