संत बाळूमामा ट्रस्टचा वाद चव्हाट्यावर ! ट्रस्टमधील दोन गटांची भर रस्त्यात दे दणादण !

650 0

कोल्हापूर जिल्ह्यातील बाळूमामा देवस्थान ट्रस्टचा गैरकारभार आणि ट्रस्टी नेमणुकीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली आहे. कोल्हापुरात मुख्य रस्त्यावर दे दणादण करत ट्रस्टी एकमेकांना भिडल्याचे पाहायला मिळाले.

श्री सद्गुरू संत बाळूमामा देवालय ट्रस्टची स्थापना २००३ मध्ये झाली होती. यात एकूण १८ ट्रस्टी आहेत. यापैकी ६ ट्रस्टींचे निधन झाले आहे. सध्या ट्रस्टवर एकूण १२ ट्रस्टी आहेत. ट्रस्टी नेमणूक, कार्याध्यक्ष नेमणूक या मुद्द्यावरून ट्रस्टमध्ये दोन गट पडले आहेत. ट्रस्टी नेमणूक आणि मंदिरामध्ये सुरू असलेल्या गैरकारभाराविरोधात आदमापूरचे सरपंच विजय गुरव यांनी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.

या संदर्भात त्यांच्या वकिलांना भेटायला आले असता त्यांच्या विरोधातील मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी देवस्थान ट्रस्टचे मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले त्याचे समर्थक आणि सरपंच विजय गुरव यांच्यामध्ये जोरदार हाणामारी पाहायला मिळाली.

सरपंच विजय गुरव यांना मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले याच्या समर्थकांनी जोरदार मारहाण केली. भोसले गटाच्या समर्थकांनी सरपंच गुरव हे गावचं आणि ट्रस्टचं नाव बदनाम करत असल्याचा आरोप केलाय. तर देवस्थान समितीच्या ट्रस्टचा कारभार चुकीच्या पद्धतीने करून बेकायदेशीरपणे ट्रस्टीची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचबरोबर कार्याध्यक्षांची नेमणूकही बेकायदेशीर झाली आहे, असा गंभीर आरोप सरपंच विजय गुरव यांनी केला आहे. एकूणच या प्रकारामुळे श्री संत बाळूमामा ट्रस्टमध्ये सुरू असलेला अंतर्गत वाद हा आता चव्हाट्यावर आला आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide