….. म्हणून राहुल गांधी यांच्यावर कारवाई केली, काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांचा नरेंद्र मोदींवर आरोप

708 0

राहुल गांधी यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली. त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. तसेच त्यांना सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस देण्यात आली. या कारवाई विरोधात काँग्रेसतर्फे देशभरात आंदोलन करण्यात येत आहे. पिंपरीमध्ये आमदार प्रणिती शिंदे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

प्रणिती शिंदे म्हणाल्या, ” सरकारने यंत्रणांचा वापर करून राहुल गांधी यांच्यावर कारवाई केली. ही लोकशाहीची हत्या असून ही गळचेपी, मुस्कटदाबी आहे. हे सरकार अहंकारी असून त्याचा निषेध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधी यांना घाबरतात, त्यामुळे त्यांच्यावर अशी कारवाई केली जात आहे” असा आरोप काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केला.

प्रणिती शिंदे म्हणाल्या, “काँग्रेसने देशभरात जय भारत सत्याग्रह सुरू केला आहे. राहुल गांधी यांच्यावर झालेली कारवाई ही केवळ राजकीय मुद्दा नाही. तर हा प्रश्न लोकशाहीचा आहे. भाजपची लोकं गांधी परिवाराबाबत खालच्या पातळीवर जाऊन बोलले त्यावेळी कारवाई झाली नाही. मात्र, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला प्रतिसाद मिळाल्याने भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यामुळे ही कारवाई केली. इडी, सीबीआय अशा यंत्रणांचा वापर करून ‘डिस्क्वाॅलीफाय’ केले. ‘हम झुकेंगे नही’, आम्ही लढणार. महाराष्ट्रातील सरकार देखील इडीचा दबाव आणून स्थापन केले आहे. हा लोकशाहीचा खून आहे. त्यांच्याकडे जनमत नाही. त्यामुळेच महापालिका निवडणुका घेतल्या नाहीत. आता दंगली घडवून आणतील आणि महापालिका निवडणुका घेतील”

भाजपची काही लोकं महिलांबाबत खालच्या पातळीवर जाऊन बोलतात. महिलेकडे वस्तू म्हणून बघितले जाते. भाजपमधील याच मानसिकतेमुळे व विचारसरणीमुळे देशाची अधोगती होत आहे. महिलांना काहीही बोलता तो देशद्रोह नाही का, असा प्रश्न प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला.

यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला, जो गरजते है, वो बरसते नहीं, राज ठाकरे ही भाजप ची बी टीम आहे. त्यांना सोबत घेऊन राज्यात दंगली घडविण्याच प्रयत्न भाजप करत आहे असा आरोप देखील प्रणिती शिंदे यांनी केला आहे. काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष कैलास कदम आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!