पत्रकाराशी गैरवर्तन केल्याप्रकरणी सलमान खान यांच्या विरोधात दाखल झालेला एफआयआर रद्द करण्याचे आदेश अंधेरी मेट्रोपॉलिटन कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे सलमान खानला दिलासा मिळाला आहे.
सलमान खानवर पत्रकार अशोक पांडे यांना धमकवल्याचा आरोप होता. आता मुंबई उच्च न्यायालयाने सलमानविरोधातील या प्रकरणातील एफआयआर रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या एकल खंडपीठाने हा निर्णय दिला. त्यामुळे सलमान खानला अंधेरी कोर्टात हजर राहावे लागणार नाही, उच्च न्यायालयाने त्याच्याविरोधात दाखल असणारी तक्रार चुकीची असल्याचे म्हणत हे प्रकरण रद्द केले आहे.
या प्रकरणी अशोक पांडे यांनी यापूर्वी अंधेरी येथील दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. आयपीसी कलम ५०४ आणि ५०६ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आलेला. त्यावर अंधेरी मेट्रोपॉलिटन कोर्टाने सलमान खानला समन्स पाठवले होते. यावर सलमान खानने उच्च न्यायालयात धाव घेतली. मागील वर्षी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देत समन्सला स्थगिती दिली होती.
काय होते प्रकरण ?
२४ एप्रिल, २०१९ रोजी सकाळी सलमान खान सायकलवरून जात होता आणि त्यावेळी त्याच्यासोबत त्याचे दोन बॉडीगार्डही होते. अशोक पांडे आपल्या कारमधून जात असताना त्यांनी सलमानला पाहून त्याचे व्हिडीओ शूटिंग सुरु केले. पण सलमानखानला ते आवडले नाही तो संतापल्यामुळे त्याच्या बॉडीगार्डने पांडे यांच्या गाडीकडे धाव घेऊन त्यांना मारहाण केली. त्यांचा मोबाइल देखील हिसकावला असा आरोप पांडे यांनी केला. पांडे यांच्या म्हणण्यानुसार व्हिडिओ शूटिंग करण्यापूर्वी त्यांनी बॉडीगार्डची परवानगी घेतली होती. पांडे यांनी पोलिसात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नव्हती. त्यामुळे त्यांना न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी सलमान खान आणि त्याच्या बॉडिगार्ड नवाझ शेखवर गैरवर्तन केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.