पुण्यात कोयता गँगवर पोलिसांनी धडक कारवाई केलेली असली तरी पुण्यात अजूनही कोयता गँगची दहशत कमी झालेली नाही. हडपसर भागामध्ये दोन गुन्हेगारांमध्ये राडा होऊन खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीवर ‘मर्डरचा रिप्लाय मर्डरच’ म्हणत कोयत्याने वार करण्यात आले.
शुभम भोंडे असे या हल्ल्यात जखमी झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2020 साली झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात शुभम जामिनावर बाहेर आला आहे. त्याला रस्त्यात गाठत त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आला. शुभम भोंडे रिक्षातून बाहेर पडत असताना त्या रिक्षाला दुचाकी आडवी घालून ‘तू अनिकेतचा मर्डर केला आहे ना, आता बघ मर्डरला मर्डर रिप्लाय देणार’ असे म्हणत शुभम याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून तपास सुरु केला आहे.
गँगची दहशत शाळांपर्यंत
आपल्या मैत्रिणीकडे का बघतो या रागातून दोन तरुणांनी नूतन मराठी विद्यालयात शिकणाऱ्या विराज आरडे नावाच्या युवकावर कोयत्याने हल्ल्ला केल्याची घटना अलीकडेच घडली होती. विराजच्या दिशेने फेकलेला कोयता त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला लागल्याने तो जखमी झाला. तोच कोयता विराजने हल्ला करणाऱ्यांवर फेकल्याने त्यात समीर पठाण नावाचा तरुण जखमी झाला. एकूणच कोयता हल्ला प्रकरण शाळेपर्यंत पोहोचल्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती.