संभाजीनगर मधील किराडपुरा येथील जुन्या राम मंदिर परिसरात दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. गाडीला धक्का लागल्याने दोन गटात बाचाबाची झाली. त्यानंतर दोन्ही गटाकडून जोरदार घोषणा देत जाळपोळ करण्यात आली. दगडफेक करण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी आलेल्या पोलिसांवरही या जमावाने दगडफेक करून पोलिसांची वाहनेही पेटवून दिली. या राड्यात तब्बल 20 वाहने जाळण्यात आली आहे. दरम्यान, खासदार इम्तियाज जलील यांनी ज्या राम मंदिर परिसरात राडा झाला, त्या मंदिराला भेट देऊन मंदिरातूनच लाइव्ह करत मंदिराला कोणतंही नुकसान झालं नसल्याचं सांगितलं. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहनही केलं.
गाडीला धक्का लागल्याचे कारण होऊन दोन गटात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यातून दोन्ही गटाकडून घोषणाबाजी करत हाणामारी सुरु झाली. काहीवेळ हा तणाव निवळल्यानंतर पुन्हा समाजकंटकांचा एक गट आला आणि त्यांनी पुन्हा घोषणाबाजी करण्यास सुरुवात करत दगडफेक केली. त्यामुळे दुसऱ्या गटाकडूनही त्यांनी प्रत्युत्तर म्हणून दगडफेक करण्यात आली. त्यानंतर दोन्ही गटाकडून खासगी वाहने जाळण्यास सुरुवात झाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला पांगवण्यास सुरुवात केली. पण जमावाने पोलिसांचीच वाहने पेटवून दिली. शेवटी पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आणि जमाव पांगण्यात आला.
या राड्यात दुचाकी आणि चारचाकी अशी 20 वाहने जळून खाक झाली आहेत. यात पोलिसांच्या 10 ते 12 गाड्यांचा समावेश आहे. आज रामनवमी आणि रमजान सुरु असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.
दरम्यान आज सकाळी एमआयएम चे खासदार इम्तियाज जलील यांनी ज्या राम मंदिर परिसरात राडा झाला, त्या मंदिराला भेट देऊन मंदिरातूनच लाइव्ह करत मंदिराला कोणतंही नुकसान झालं नसल्याचं सांगितलं. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहनही केलं. मी किराडपुरातील राम मंदिरात आहे. मी स्वत: राममंदिरात आलो आहे. मी स्वत: मंदिराची पाहणी केली आहे. मंदिरात काहीच नुकसान झालं नाही. बाहेरही नुकसान नाही. कुणी काही अफवा पसरवत असेल तर अफवांवर विश्वास ठेवू नका. शांतता राखा, असं आवाहन इम्तियाज जलील यांनी केलं आहे. पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करावं. ड्रग्सचा कारभार करणाऱ्यांना अटक करावी. सीसीटीव्ही पाहून कारवाई करा, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली. मंत्री अतुल सावे यांनी देखील राममंदिराचं नुकसान झालं नसून मंदिराला कोणतीही इजा झालेली नाही, असं सांगितलं.