पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे आज दुपारी साडेबाराच्या सुमारास निधन झाले आहे. वयाच्या ७२ व्या वर्षी गिरीश बापट यांनी दीनानाथ रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. प्रकृती अत्यवस्थ झाल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. याबाबतची माहिती भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली आहे.
गिरीश बापट यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे. गिरीश बापट यांचे पार्थिव दुपारी २ ते ६ पर्यंत शनिवार पेठेतील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून सायंकाळी ७ वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गिरीश बापट यांची प्रकृती खालावल्याची बातमी मिळताच आज सकाळपासून भाजच्या गोटात हालचालींना वेग आला होता. भाजपच्या कार्यकर्त्यांनी दीनानाथ मंगेश रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते चंद्रकांत पाटील, यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते पुण्याकडे रवाना झाले आहेत.
गिरीश बापट हे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जात होते. पुण्यातील महत्वाच्या नेत्यांमध्ये त्यांची गणना होत असे. गेल्या काही वर्षांपासून गिरीश बापट यांना दुर्धर आजाराची लागण झाल्यामुळे ते राजकारणापासून अलिप्त झाले होते. मात्र, नुकत्याच झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी आजारपण बाजुला सारून कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. या मेळाव्यात गिरीश बापट ऑक्सिजन सिलेंडरसहित उपस्थित होते. बोलताना त्यांना धाप लागत होती. आपल्या भाषणातून त्यांनी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये उत्साह जागवण्याचा प्रयत्न केला होता.
राजकीय जीवनात प्रवेश करण्यापूर्वी गिरीश बापट टेल्को कंपनीत कामगार म्हणून कामाला देखील होते. १९८३ ते २०२३ पर्यंत पुणे शहराच्या राजकीय वर्तुळात सक्रीय राहणारे गिरीश बापट तीन वेळा नगरसेवक, पाच वेळा आमदार राहिले आहेत. २०१४ ते २०१९ दरम्यान बापट यांनी फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती. २०१९ पासून ते पुणे लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करत होते.
“पुणे शहराच्या राजकारणात गेली ४० वर्षं अतिशय सक्रिय असलेले बापट माझे अतिशय जवळचे मित्र होते. गेल्या ३५ वर्षांपासून आम्ही राजकारणात एकत्र काम केलं”, अशी भावनिक प्रतिक्रिया बापट यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे यांनी दिली आहे. बापट यांच्याबाबद्दल बोलताना अंकुश काकडे यांच्या भावना अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
बापट यांच्या निधनाने पुण्याच्या राजकारणाचं, समाजकारणाचं, पुणे-महाराष्ट्र भाजपाचं हे फार मोठं नुकसान आहे. विरोधी पक्षांना सोबत घेऊन कसं काम करायचं यामध्ये त्यांचं कौशल्य होतं. एखादी समस्या कशी सोडवायची, याचं त्यांचं वेगळं कसब होतं. ते सर्वांचे मित्र होते. कुणाशीही शत्रुत्व नाही. हे सगळं एका माणसामध्ये आयुष्यभर मेहनत घेऊन निर्माण होतं अशी प्रकृती पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
महाराष्ट्राच्या विधानसभेत काम करत असताना गिरीश बापट मंत्री होते. योगायोगाने आम्ही संसदेत एकत्र काम करू लागलो. संसदेच्या एका कमिटीचे ते चेअरमन होते आणि मी सदस्य होतो. गेल्या ५ वर्षांत सातत्याने गिरीश बापट यांनी सर्व सहकारी सदस्यांशी सलोख्याचे संबंध ठेवले होते. अत्यंत मनमिळाऊ आणि लोकप्रिय नेता असं त्यांचं वर्णन करावं लागेल. मंत्रीपद मिळाल्यानंतरही कोणतीही मिजास न ठेवता त्यांनी खेळकर स्वभाव कायम ठेवला होता अशी भावना खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली.
गिरीश बापट यांची राजकीय कारकीर्द-
गिरीश बापट हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक
जनसंघातून राजकारणात प्रवेश
नगरसेवकपदापासून ते खासदारकीपर्यंत राजकीय कारकीर्द
गिरीश बापट 1995 पासून सलग पाच वेळा आमदार
2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मोहन जोशी यांचा पराभव करून खासदार