ईडीच्या दोन कर्मचाऱ्यांना मुंबईत अटक, पुण्यातील या व्यापा-याच्या होते संपर्कात; संवेदनशील माहिती लीक केल्याचा आरोप

707 0

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने आपल्या मुंबई कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. त्यांच्यावर गुप्त फाईल्स लीक केल्याचा आरोप आहे. हे दोन्ही कर्मचारी पुण्यातील व्यापारी आणि सेवा विकास सहकारी बँकेचे माजी संचालक अमर मुलचंदानी यांच्या संपर्कात होते आणि त्यांनी लाचखोरीच्या तपासाची ‘संवेदनशील’ माहिती दिली होती, असे पुरावे ईडीला मिळाले आहेत. ईडीने आपल्या दोन कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त माजी अध्यक्षांच्या एका निकटवर्तीयालाही अटक केली आहे.

मूलचंदानी आणि त्याच्या कुटुंबीयांना अटक

माजी संचालकांविरोधात ईडीच्या कारवाईत अडथळा आणणे आणि पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्र पोलिसांनी २७ जानेवारी रोजी मूलचंदानी आणि त्यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांना अटक केली होती.

तपासादरम्यान असे आढळून आले आहे की, मुंबईतील ईडी कार्यालयाच्या आवारात एक व्यक्ती नेहमी पाळत ठेवत असे. ईडीने पकडल्यानंतर बबलू सोनकर हा अमर मूलचंदानी यांचा कर्मचारी असून साक्षीदारांना धमकावणे, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि ईडीच्या कर्मचाऱ्याला लाचेची रक्कम देण्याचे काम त्याच्यावर सोपविण्यात आले होते.

ईडी कर्मचाऱ्याची कबुली

सोनकरच्या ताब्यातून आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय ईडीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अमर मूलचंदानी यांना संवेदनशील माहिती देत असल्याची कबुली दिली आहे. ईडीने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.

४२९ कोटींचा घोटाळा

सहकारी बँकेचे माजी संचालक अमर मूलचंदानी यांच्यासह काही संचालक मंडळावर ईडीने जानेवारीत कारवाई केली होती. ईडीने त्यांच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. सेवा विकास सहकारी बँकेला ४२९ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. कोणतेही आर्थिक निकष न पाळता सहकारी बँक कुटुंबाच्या मालकीच्या बँकेप्रमाणे चालविली जात होती. ९२ टक्क्यांहून अधिक कर्ज खाती एनपीए झाली आणि आता बँक दिवाळखोरीत गेली आहे.

Share This News
error: Content is protected !!