पुणे : तो अधिकारी पंतप्रधान कार्यालयात वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगायचा ,या ठगाला झेड प्लस सुरक्षा, बुलेटप्रूफ एसयूव्ही गाडी आणि राहण्यासाठी फाईव्ह स्टार हॉटेलची देखील सुविधा केली गेली होती. या बहाद्दरान थेट टॉप अधिकाऱ्यांच्या बैठका देखील घेतल्या असल्याचे समजते. एवढंच नाही तर एसडीएम रँकच्या अधिकाऱ्यांसोबत अनेक वेळा दौरा देखील केला होता. परंतु जम्मू सीआयडीला या किरण पटेल नावाच्या बनावट अधिकाऱ्यावर संशय आला. आणि अधिक तपास केल्यानंतर तो एक ठग असल्याचं निष्पन्न झालं. किरण पटेल याला दहा दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली होती. या महाठगावर भादवि 119, 420, 467, 468, 471 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धक्कादायक म्हणजे या महाठागच पुण्यात देखील कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी किंग्डम ऑफ टोंगा यामध्ये या किरण पटेल नामक व्यक्तीने त्याची प्रोफाइल पाठवली होती. त्यानंतर विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी अहमदाबादमध्ये किरण पटेल याची भेट देखील घेतली. या किरण पटेलची भेट घेतल्यानंतर विद्यापीठाचे अधिकारी खुश झाले. एवढेच नाही तर या किरण पटेल नावाच्या व्यक्तीची सोशल मीडियावर प्रोफाइल देखील तपासण्यात आली होती. यामध्ये पीएमओचा दीर्घ काळापासून उल्लेख होता. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाला या ठगावर विश्वास बसला आणि संचालक पदावर त्याची नियुक्ती करण्यात आली होती.
दरम्यान या युनिव्हर्सिटीला जेव्हा जम्मू कश्मीर पोलिसांचे पत्र मिळालं तेव्हा या विद्यापीठाला किरण पटेल याचं खरं रूप समोर आलं. यानंतर विद्यापीठाने किरण पटेल यांची सल्लागार पदावरून हकालपट्टी केली आहे. परंतु या संदर्भात पाठवलेला मेल हा बाउन्स झाला आहे. दरम्यान विद्यापीठाची आर्थिक फसवणूक झाली नसल्या कारणामुळे विद्यापीठाने अद्याप तरी कोणताही गुन्हा दाखल केला नाही. परंतु फसवणूक झाल्याचं जर सिद्ध झालं तर तक्रार दिली जाईल असं विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितल आहे.
याप्रकरणी जम्मू कश्मीर पोलिसांनाही पुण्याच्या या विद्यापीठाने उत्तर पाठवलं असलं तरीही जम्मू कश्मीर पोलिसांकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण किंवा चौकशीसाठी पोलीस आले नाहीत असे देखील समजते आहे.