पुणे : भाजपसाठी प्रतिष्ठेची असलेल्या कसबा पोटनिवडणुकीतून धक्कादायक निकाल समोर आला आहे. भाजपला आता मोठी हार पत्करावी लागत असून अख्ख मंत्रिमंडळ प्रचाराला आलं तरीही हेमंत रासने ना पराभव स्वीकारावा लागला आहे.
भाजपचे हेमंत रासने आणि कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला होता. दरम्यान निकालांती आता राजेंद्र धंगेकर हेच विजयाचा गुलाल उधळणार असल्याचं स्पष्ट झाले आहे.
मागची 30 वर्षे भाजपचा बालकिल्ला राहिलेल्या कसबा मतदारसंघाला आता सुरुंग लागला आहे. सकाळी मतमोजणीला सुरूवात झाली तेव्हा पहिल्या फेरीपासूनच रविंद्र धंगेकर आघाडीवर होते. अखेर आता त्यांचा विजय झाला आहे. रविंद्र धंगेकर यांनी 11 हजार 40 मताधिक्य मिळवत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना पराभूत केलं आहे.
कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी 50.06 टक्के मतदान झालं होतं. म्हणजेच, 2 लाख 75 हजार 679 मतदारांपैकी 1 लाख 38 हजार 018 मतदारांनी मतदान केलं होतं. कसबा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मतमोजणीपूर्वीपासूनच राजकीय वर्तुळात भाजपच्या हातून पारंपारिक मतदारसंघ काँग्रेस हिसकावून घेणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु होत्या.