भंडारा : सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. एकीकडे प्रश्नपत्रिका मधील चुका आहेत. तर दुसरीकडे जोरदार कॉपीमुक्त अभियान देखील राबवले जात आहे. असं असताना आता भंडाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक अशी घटना समोर येते आहे. कॉपीमुक्त अभियानाच्या नावाखाली बारावीच्या मुलींची अंतर्वस्त्र तपासली जात असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. एवढंच नाही तर या विद्यार्थिनींनी घाबरून परीक्षा देणार नाही असे देखील म्हटले आता या संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे. त्यामुळे लवकरच सत्य समोर येईल.
दरम्यान शहापूर येथील नानाजी जोशी कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच परीक्षा केंद्र असून डिफेन्स सर्विस ज्युनिअर कॉलेज आणि नानाजी जोशी जुनिअर कॉलेज से विद्यार्थी परीक्षा देत आहेत. मात्र डिफेन्स सर्विस ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी चुकीच्या पद्धतीने तपासणी होत असल्याचा आरोप केला आहे. यावेळी मुलींनी सांगितले की, त्यांची अंतर्वस्त्र देखील तपासली गेली.
नानाजी जोशी जुनिअर कॉलेजच्या केंद्र संचालकांनी सर्व आरोप फेटाळले
याप्रकरणी नानाजी जोशी जुनिअर कॉलेजच्या केंद्र संचालकांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. शिक्षण विभागाच्या गाईडलाईन्स नुसारच मुलींची तपासणी होत असून महिला शिक्षकच या मुलींची तपासणी करत आहेत. तसेच डिफेन्स सर्विस ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी लावलेले हे आरोप बिन बुडाचे असल्याचे देखील नानाजी जोशी येथील शिक्षक आणि केंद्र संचालकांनी म्हटल आहे.
याप्रकरणी आता शिक्षणाधिकारी यांच्याकडे तपास गेला असून यातून काही वेगळे खुलासे देखील होण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे तपास झाल्यानंतरच नक्की प्रकरण काय आहे हे समोर येईल.