#CHINCHWAD : पोटनिवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट; चिंचवडमध्ये होणार तिरंगी लढत, अपक्ष राहुल कलाटेंना वंचितचा पाठिंबा !

750 0

चिंचवड : वंचित बहुजन आघाडीने एक पत्रक जाहीर करून पोट निवडणुकीसाठीची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वंचित ने चिंचवडमध्ये अपक्ष आमदार राहुल कलाटे यांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे आता चिंचवड मधून तिरंगी लढत होणार आहे. दरम्यान चिंचवड पोट निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने अश्विनी जगताप महाविकास आघाडीच्या वतीने नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात लढत होणार आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडी कोणाला पाठिंबा देणारे याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलं होतं. चिंचवड मधून अपक्ष आमदार राहुल कलाटे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची दुरदृष्य प्रणालीद्वारे व्हिडिओ कॉन्फन्सद्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकी संदर्भात चर्चा झाली. कसबा पोटनिवडणूक काँग्रेस लढत आहे असं दिसतंय. परंतु काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडून अजूनही वंचित बहुजन आघाडीकडे कसबा मतदारसंघात पाठिंबा द्यावा असे विनंती पत्र आलेले नाही आणि म्हणून कसबा पोटनिवडणूकी संदर्भात निर्णय घेण्यात आलेला नाही.

पहाटेच्या शपथविधी नंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत अजित पवार यांनी स्पष्ट केले होते की हा त्यांच्या पक्षाचा निर्णय होता आणि वरिष्ठांनी तसे आधीच ठरवले होते. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पहाटेच्या शपथविधी संदर्भात खुलासा केलेला आहे आणि त्यामध्ये सरकार बनविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते आणि अध्यक्ष यांचाही आशिर्वाद होता असे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपबरोबर जाणार नाही असा कुठेही खुलासा केलेला नाही.

पिंपरी चिंचवडमध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल कलाटे हे अपक्ष उमेदवार होते. त्यांना त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला होता.‌ आणि त्यांनी 1 लाख 12 हजार मते त्यावेळी घेतली होती. राहुल कलाटे हे शिवसेनेचे सभागृहाचे नेते आहेत. त्यामुळे ही जागा शिवसेनेने लढवावी आणि राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात यावी असा आमचा आग्रह होता. मात्र तसे घडले नाही,असं वंचित बहुजन आघाडीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

गौप्यस्फोटामुळे महाविकास आघाडीमध्ये परिस्थिती बदललेली आहे. वंचित बहुजन आघाडी पूर्ण विचार करून भाजपाला पिंपरी चिंचवड मतदारसंघात कोण थांबवू शकले तर राहुल कलाटे थांबवू शकतात या मताला आली आहे. वंचित बहुजन आघाडी राज्य कार्यकारिणी एकमताने राहुल कलाटे यांच्या पाठीशी उभे राहील. यादृष्टीने पाठींबा देऊन निवडून आणण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड मधील मतदारांना वंचित बहुजन आघाडी करत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

वंचितने राहुल कलाटेंना पाठिंबा देत महाविकास आघाडीला चांगलाच धक्का दिला आहे. राहुल कलाटे यांना वंचितचा पाठिंबा मिळाल्याने महाविकास आघाडीची चिंचवडमध्ये चांगलीच धाकधूक वाढली आहे.

Share This News
error: Content is protected !!