शाळेची फी न भरल्याच्या कारणावरून विद्यार्थ्यांना ठेवले डांबून; पुण्यातील ‘या’ शाळेतील धक्कादायक घटना

566 0

वाघोली : वाघोली येथील लेक्सिकॉन इंटरनॅशनल स्कूलची फी भरली नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर डांबून ठेवल्याप्रकरणी पालकांनी व मनसे पदाधिकारी यांनी स्कूल विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. संबंधितांवर खंडणी व अपहरणाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. स्कूलच्या प्रिन्सिपल यांनी मात्र पालकांचा गैरसमज झाल्याचे यावेळी सांगितले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वाघोलीतील लेक्सिकॉन इंटरनॅशनल स्कूलमध्ये बुधवारी (ता. १८) दुपारी १ वाजता विद्याथ्र्यांची घरी जाण्यासाठी सुट्टी झाल्यानंतर काही मुलांना शाळेतच ठेवून पालकांना फी भरण्यासंदर्भात सांगण्यात आले. फी भरा आणि मुलांना घेऊन जा असे शाळेकडून सांगण्यात आल्याचे काही पालकांनी सांगितले. फी न भरलेल्या विद्यार्थ्यांचे पालक धावत पळत शाळेत आले आणि शाळेने केलेल्या प्रकाराबाबत विचारणा केली.

त्याचवेळी मनसे पदाधिकारी व पालक यांनी एकत्रित शाळेच्या प्रिन्सिपल यांना तीव्र शब्दात जाब विचारला. पालकांचा रोष पाहता लोणीकंद पोलिसांनादेखील यावेळी बोलाविण्यात आले. काही पालक मुलांना घेण्यासाठी वर्गावर गेले असता त्यांना मुलांना भेटू दिले जात नसल्याचा आरोपही करण्यात आला. पोलिसांच्या मध्यस्तीने वातावरण निवळण्याचा प्रयत्न केला गेला. यानंतर मुलांना पालकांच्या हवाली करण्यात आले असले तरी संतप्त पालक व मनसे पदाधिकारी यांनी शाळेच्या विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात फी भरली नसल्याने मुलांना डांबून ठेवल्याची लेखी तक्रार दाखल करून खंडणी, अपहरणाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

या प्रकाराबाबत स्कूलच्या प्रिन्सिपल यांना पालकांनी खडया शब्दात जाब विचारला असता पालकांचा गैरसमज झाला असल्याचे सांगून गोंधळात न बोलता प्रत्येक पालकाशी वैयक्तिक रित्या भेटून बोलणार असल्याचे यावेळी सांगितले.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide