शालेय विद्यार्थ्यांसाठी रस्ते होणार सुरक्षित ! पुणे महापालिका शहरातील रस्त्यांवर साकारणार ‘सेफ स्कूल झोन’

548 0

पुणे : शालेय विद्यार्थ्यांना शाळांमध्ये सुरक्षितरित्या चालत अथवा सायकलवर जाता यावं यासाठी पुणे महापालिकेन ‘स्कूल सेफ झोन’ या प्रकल्पाच नियोजन केलं आहे. या प्रकल्पाची पाच रस्त्यांवर प्रायोगिक तत्त्वावर, तर तीन रस्त्यांवर कायमस्वरूपी अंमलबजावणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

शहरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. अपघाताचं प्रमाण देखील हल्ली वाढलं आहे. पथ विभागाने हीच समस्या ओळखून आगामी काळात विद्यार्थी कोणावरही अवलंबून न राहता बिनधास्तपणे शाळेत जाऊ शकतील यासाठी आराखडा तयार केला आहे.

परदेशात ‘स्कूल ऑफ झोन’ नावाची संकल्पना राबवली जाते. त्याच धर्तीवर पुणे महापालिका हा प्रकल्प साकारणार आहे. यात शाळेच्या परिसरातील 1 किमी चा परिसर विकसित केला जाणार आहे.

महापालिकेच्या वतीन ‘सेफ स्कूल’ ही रोड सेफ्टीवर आधारित प्रोजेक्ट स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतून पहिल्या तीन स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. त्यांनी केलेल्या सादरीकरणाच्या आधारावर खराडी, पर्वती आणि डेक्कन परिसरातील रस्त्यांवर 11 ते 17 डिसेंबर 2022 या कालावधीत प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करण्यात आली. त्या ठिकाणी मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर आता महापालिकेने तो भाग कायमस्वरूपी ‘सेफ स्कूल’ करण्याचा निर्णय घेतला आहे.

यंदाच्या वर्षी सदाशिव पेठ, नारायण पेठ, लोहगाव, कोंढवा, पाषाण या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर ‘सेफ स्कूल’ प्रकल्प राबवण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने शहरातील शाळा असलेल्या सर्व रस्त्यांवर हा प्रकल्प राबवण्याचा महापालिकेचा मानस आहे.

Share This News
error: Content is protected !!