नवी दिल्ली : माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं प्रसारमाध्यमांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये मृतदेहाचे फोटो रक्ताने माखलेले फोटो किंवा कोणतेही त्रासदायक ठरणारे व्हिडिओ टीव्ही चॅनल्सवर दाखवून नये, अपघात मृत्यू आणि हिंसेच्या घटनांची माहिती देण्याबाबत मंत्रालयाने नियमावली जारी केली आहे. यामध्ये महिला लहान मुले आणि वृद्ध यांच्यावरील हिंसाचाराचा देखील समावेश आहे.
माहिती प्रसारण मंत्रालयाने म्हटले आहे की, फोटो अस्पष्ट करणे अशी कोणतीही जबाबदारी न घेता ते आणखी क्रूर पद्धतीने दाखवले जातात. अशा घटनांचे रिपोर्टिंग करण्याची पद्धत प्रेक्षकांसाठी अप्रिय आणि त्रासदायक ठरू शकते. मंत्रालयाने असे निरीक्षण नोंदवले आहे की, बहुतेक प्रकरणांमध्ये व्हिडिओ सोशल मीडिया वरून घेतले जातात आणि एडिट न करताच किंवा ब्लर न करताच ते थेट प्रसारित केले जातात.
अशा प्रसारणाबाबत चिंता व्यक्त करून मोठ्या सार्वजनिक हिताचा विचार करून तसेच वृद्ध महिला आणि लहान मुलांसह दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या प्रेक्षकांच्या मनाचा विचार करून मंत्रालयाने सर्व खाजगी टीव्ही चॅनेल्सना गुन्हे अपघात आणि हिंसाचार मृत्यू गुन्हेगारी या संदर्भात रिपोर्टिंग करताना मनाला त्रास होईल असे फोटो दाखवू नये अशा सूचना केल्या आहेत.