पुणे : अनेक दिवसांपासून भेकराईनगर परिसराला दूषित पाणीपुरवठा होत आहे. याच्याच निषेधार्थ आज संतप्त स्थानिक नागरिकांनी भेकराईनगर येथे पुणे सासवड रोडवर आंदोलन केले आहे.गेले अनेक दिवस गढूळ पाणी पुरवठा होत असल्यामुळे संतप्त नागरिकांनी भेकराईनगर चौकात ठाण मांडून पुणे सासवड रोड अडवून धरला. त्यामुळे दुतर्फा वाहतूक कोंडी झालेली आहे.
कालव्याला खडकवासला धरणातून केला जाणारा पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे, लगत असलेल्या विहिरींना पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाई जाणवत आहे. कालव्यातील दूषित पाणी विहिरीमध्ये उतरते, पुढे तेच दूषित पाणी काही प्रमाणात प्रक्रिया करून नागरिकांना वापरण्यासाठी दिले जाते आहे.
पिण्याचे पाणी सुद्धा टॅंकरने विकत घ्यावे लागते. ते सुद्धा आता वेळेवर मिळत नाही. त्यामुळे नागरिक संतप्त झालेले आहेत. आज सकाळी अकरा वाजल्यापासून रस्ता रोको आंदोलन सुरू आहे.