नाशिक : नाशिक मधील विपिन बाफना हत्याकांड प्रकरणातील दोन आरोपींना नाशिक न्यायालयाने दोषी ठरवून मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. 2013 मध्ये घडलेल्या या हत्याकांडाने नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली होती.
2013 मध्ये धान्य व्यापारी गुलाबचंद बाफना यांचा मुलगा विपिन बाफना याचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर एक कोटीची खंडणी या आरोपींनी मागितली होती. खंडणी न दिल्याच्या कारणाने आणि पोलिसात तक्रार दिली या कारणाने आरोपींनी तरुणाच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार करून त्याची क्रूरतेने हत्या केली होती.
अपहरणाच्या दुसऱ्या दिवशी आडगाव शिवारात विपिनचा मृतदेह आढळून आला होता. धक्कादायक म्हणजे विपींनची हत्या करत असतानाचा एक व्हिडिओ देखील मिळाला आहे. या आरोपींनी हा व्हिडिओ चित्रित केला होता.
या व्हिडिओच्या आधारे चेतन पगारे आणि अमन जट यांच्यावर आरोप सिद्ध झाले असून इतर तिघांची मात्र सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा नाशिक न्यायालयाने सुनावली आहे.