पुणे : तुम्ही पुण्यातून रेल्वेनं प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. यापुढं रेल्वे प्रवाशांना विमानातळा प्रमाणंच रेल्वे स्टेशनवरही एक तास आधी पोचावं लागणार आहे. पुण्याहून सुटणाऱ्या ट्रेनमध्ये chain pulling म्हणजे चेन ओढण्याचं प्रमाण वाढलं असल्यामुळं रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना हे आवाहन करण्यात आलंय.
पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून वाहतूककोंडीची समस्या प्रचंड प्रमाणात वाढली असल्यानं प्रवासी रेल्वेच्या वेळेत पोचत नाहीत. परिणामी काही प्रवाशांचे नातेवाईक जाणूनबुजून ट्रेन सुरु झाली की चेन ओढतात. रेल्वेची चेन खेचण्याचं प्रमाण वाढू लागल्यानं रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याचं प्रमाण वाढू लागलंय.
पुणे शहरात संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते. त्यातच गोरखपूर, इंदूर, कोलकाता, जम्मू यांसारख्या लांब पल्ल्याच्या गाड्या पुण्यातून संध्याकाळी सुटतात. त्यामुळं काही प्रवाशांची ट्रेन निघून जाते आणि बहुतांश चेन खेचण्याचे प्रकार संध्याकाळच्या वेळीच घडतात. या पार्श्वभूमीवर रेल्वे व्यवस्थापनाकडून प्रवाशांना नियोजित ट्रेनच्या एक तास
आधी स्टेशनवर येण्याचं आवाहन करण्यात आलंय.
एकूणच काय तर रेल्वे प्रवाशांनो, चेन खेचून दंड भरण्याची अथवा तुरुंगवासाची शिक्षा भोगायची नसेल तर आपल्या नियोजित ट्रेनच्या एक तास आधीच रेल्वे स्टेशनवर पोहोचा आणि रेल्वे प्रवासाचा आनंद घ्या.