पुणे : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक शब्द वापरून शिवाजी महाराजांची अवहेलना केल्याच्या निषेधार्थ सर्वधर्मीय शिवप्रेमी पुणेकरतर्फे उद्या मंगळवार दि 13 डिसेंबर 2022 रोजी पुणे बंद आयोजित करण्यात आला आहे. तसेच मुक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
केंद्र सरकरने राज्यपाल कोश्यारी यांची तातडीने हकालपट्टी करावी. राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी, भारतीय जनता पक्षानेही माफी मागावी या मागणीसाठी उद्या मंगळवारी पुणे बंद व मुकमोर्चा आयोजित केला आहे.
उद्या मंगळवारी सकाळी 9-30 वाजता डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मुक मोर्चास प्रारंभ होणार आहे. डेक्कन जिमखाना, अलका चित्रपटगृह चौक, मार्गे लक्ष्मी रस्त्याने बेलबाग चौकातून लालमहाल येथे मुकमोर्चाची सांगता जाहीर सभेने होणार आहे.
या मोर्चात छत्रपती उदयनराजे महाराज, छत्रपती संभाजी राजे, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आदी नेते सहभागी होणार आहेत तसेच ते जाहीर सभेतही बोलणार आहेत.
या मुकमोर्चात पुणे शहर व जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळाने या बंदला पाठिंबा दिला आहे. तसेच मंडळांचे कार्यकर्ते या मुकमोर्चात सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर विविध सामाजिक संघटना, संस्था, रिक्षा संघटना, व्यापारी संघटना सर्वस्वी नागरिक स्वयंस्फूर्तीने या बंद व मोर्चात सहभागी होणार आहेत.
तसेंच विविध पक्षाचेही नेते व कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होणार आहेत.