सोलापूर : लातूरचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभु जाधव यांच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्नेहलता प्रभु जाधव असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. स्नेहलता या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव यांच्या पत्नी होत्या.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मुलाच्या लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी जाधव कुटुंबीय हे कर्नाटक मधील चडचण येथे गेले होते. शनिवारी लातूरकडे परत येत असताना सोरेगाव येथील एका हॉटेलमध्ये मुक्कामी असताना स्नेहलता जाधव यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
आत्महत्या करण्यापूर्वी स्नेहलता यांनी आपल्या नातेवाईकांना आत्महत्या करत असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर जवळील नातेवाईकांनी हॉटेलवर ताबडतोब धाव घेतली. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. त्यानंतर ताबडतोब त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.