Breaking News

CM EKNATH SHINDE : अभिनयातील बहुआयामी ‘विक्रम’ काळाच्या पडद्याआड !

267 0

मुंबई : ‘भेदक नजर, भारदस्त आवाज आणि संयत अभिनयाने वैविध्यपूर्ण अशा भूमिकांचा नावाप्रमाणेच ‘विक्रम’ करणाऱ्या प्रतिभावंत महान अभिनेत्याचे निधन कला क्षेत्राची हानी आहे, अशी शोकमग्न भावना व्यक्त करत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, विक्रम गोखले यांना घरातूनच अभिनयाचा वारसा लाभला. हा वारसा त्यांनी दमदारपणे पुढे नेला. मराठीसोबतच त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत, रंगभूमी, दूरचित्रवाणी आपल्या दमदार कामगिरीने आदराचे आणि वेगळं स्थान निर्माण केले. प्रेक्षकांचीही कलाकाराच्या कलासाधनेत जबाबदारी असते असं खडसावून सांगणारा सडेतोड भूमिका घेण्याचे धारिष्ट्य दाखवणारा कलाकार म्हणून ते परिचित होते. त्यांनी कसदार अभिनयाने नायक, सहअभिनेता ते चरित्र नायक अशा सर्वच प्रकारच्या भूमिकांना न्याय दिला.

अभिनयात ‘निशब्द-निश्चल’अशी जागा घेण्याचे कसब असो वा, पल्लेदार संवादफेक त्यातून त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. एका प्रतिभावंत मराठी सुपुत्राने भारतीय रंगभूमी, चित्रपटसृष्टीसाठी दिलेले योगदान आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद असेच आहे. या क्षेत्रातील नव्या पिढीला ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनामुळे एका कलासक्त मार्गदर्शकाची निश्चितच उणीव भासत राहील, ही कला क्षेत्राची हानीच आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना भावपूर्ण श्रद्धांजली!’

Share This News
error: Content is protected !!