Devendra Fadnavis : “विक्रम गोखलेंच्या निधनाने अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ हरपले…!”

262 0

पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ हरपले असल्याची शोकसंवेदना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सिनेसृष्टी गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने सिनेमा जगत आणि नाट्यसृष्टीचे कधीही भरुन न निघणारे नुकसान झाले आहे. एक चतुरस्त्र अभिनेता, दिग्दर्शक, नाट्य कलावंतच नाही, तर व्यक्ती म्हणून सुद्धा मोठ्या मनाचे, व्यापक सामाजिक भान असलेले हे व्यक्तिमत्त्व होते. भारदस्त अभिनेता, देहबोली आणि डोळ्यातून भाव व्यक्त करण्याचे त्यांचे कसब आणि आत्मविश्वासी बाणा हे क्वचितच कुणाला लाभले. अभिनयाच्या क्षेत्रातील त्यांचा परिचय तर मोठा होताच, पण सैन्यदलात काम करताना अपंगत्त्व आलेल्यांच्या कुटुंबीयांना मदत किंवा निराधार बालकांचे शिक्षण यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ आपल्यातून हरपले आहे. प्रत्येक भूमिकेला सुयोग्य न्याय देणार्‍या, ती व्यक्तिरेखा जीवंत साकारणार्‍या विक्रम गोखले यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या लाखो चाहत्यांना लाभो, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना!

Share This News
error: Content is protected !!