विद्यापीठ अधिसभेचा आज निकाल : मतमोजणीचे विद्यापीठाकडून सूक्ष्म नियोजन; खाशाबा जाधव क्रीडासंकुलात सीसीटीव्हीच्या निगराणीखाली मतमोजणी

304 0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीसाठी झालेल्या मतदानाची दिनांक २२ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून यासाठी सर्व तयारी विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत मतदारांची संख्या दुप्पट असल्याने यंदा निकालाला अधिक वेळ लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेच्या दहा जागा पदवीधरांमधून निवडून देण्यासाठी विद्यापीठाकडून रविवार दिनांक २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. याची मतमोजणी २२ नोव्हेंबर सकाळी आठ वाजल्यापासून विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडासंकुल येथे होणार आहे.

याबाबत माहिती देताना विद्यापीठाचे कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.प्रफुल्ल पवार म्हणाले, सर्व मतमोजणी ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीत होणार आहे. यासाठी साधारण १७ हजार चौरसफूट अशा भव्य क्रीडा संकुलात ७२ काउंटर तयार करण्यात आले आहे. विद्यापीठातील जवळपास ३०० प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी या प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. मतमोजणीचे आकडे दर काही वेळाने मोठ्या पडद्यावर जाहीर करण्यात येतील.

मागील वेळी निकाल जाहीर होण्यासाठी पहाटेचे सहा वाजले होते या सर्व बाबी गृहीत धरून यंदा महिला आणि ज्येष्ठ कर्मचारी यांचा विचार करून व जास्तीत जास्त युवा कर्मचारी अधिकारी यात सहभागी केले आहेत.

Share This News
error: Content is protected !!