पुणे : आज दिनांक १७•११•२०२२ रोजी पहाटे ०४•४२ वाजता कोथरुड, पौड रोड, आनंदनगर, प्रभा को ऑप सोसायटीमधे आग लागल्याची वर्दि अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळताच कोथरुड अग्निशमन केंद्र येथील अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले.
घटनास्थळी पोहोचताच प्रभा को ऑप सोसायटीत तीन मजली इमारतीत दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याने खिडकीमधून आगीच्या ज्वाळा बाहेर येत असल्याचे निदर्शनास आले. त्याचवेळी त्या आग लागलेल्या सदनिकेमधे दोन जण अडकले असल्याची माहिती मिळाली असता जवानांनी होज पाईप घेऊन वर जाऊन एकीकडे पाण्याचा मारा सुरू केला तर घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशमन अधिकारी गजानन पाथ्रुडकर व जवान नितिन घुले यांनी तातडीने ब्रिदिंग अॅपरटस सेट (श्वशन उपकरण) परिधान करुन आत एका खोलीत धुरामधे अडकलेल्या एक विद्यार्थी व एक विद्यार्थीनी यांना सुखरुप बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी आणले व त्यांचा जीव वाचविला.
जवानांनी जेट स्प्रे वापर करुन पाणी मारत सुमारे दहा मिनिटात पुर्ण विझवली. आग नेमकी कशामुळे लागली समजू शकले नसून विद्यार्थी पहाटेपर्यंत अभ्यास करीत होते असे त्यांनी सांगितले. पुढच्या खोलीमधील लाकडी सामान, सोफा, कपाट, खिडक्या इत्यादी साहित्य जळाले. एका विद्यार्थ्याला किरकोळ स्वरुपात आगीची झळ हाताला लागली आहे.
या कामगिरीत कोथरुड अग्निशमन केंद्र अधिकारी गजानन पाथ्रुडकर, वाहनचालक रमेश गायकवाड व जवान नितिन घुले, संजय महाले, शिवाजी कोंढरे, वैभव आवरगंड यांनी सहभाग घेतला. सदर विद्यार्थ्यांनी अग्निशमन दल वेळेत आल्याने आम्ही सुखरुप बाहेर आलो याबद्दल दलाचे आभार मानले.