कुत्ता गोळी ! अत्यंत कमी पैशात नशा मिळवून देणाऱ्या या गोळीनं असंख्य तरुणांना आपल्या व्यसनाच्या विळख्यात ओढलंय. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात कुत्ता गोळीचं संकट दिवसेंदिवस वाढतच चाललं असून हजारो रुपयांचा कुत्ता गोळीचा साठा सापडल्यानं एकच खळबळ उडालीये. मालेगाव शहर का बनलंय ‘कुत्ता’ गोळीचं हब ? पाहा यावर प्रकाश टाकणारा TOP NEWS मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट…
मेंदूवर परिणाम करणाऱ्या या गोळ्या सेवन केलेली व्यक्ती आपल्याच धुंदीत राहते. या गोळीत उत्तेजक पदार्थ असल्यानं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तिची विक्री करण्यास मनाई आहे. मात्र काही स्टोअर्समध्ये या गोळ्या सर्रासपणे मिळत आहेत.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात या कुत्ता गोळीनं अक्षरशः कहर माजवलाय. अन्न व औषध प्रशासनानं मालेगावात नुकतीच मोठी कारवाई केलीये. मालेगावात हजारो रुपयांचा कुत्ता गोळीचा साठा सापडल्यानं एकच खळबळ उडालीये. कुत्ता गोळीचं हब म्हणून मालेगाव शहराची ओळख बनत चाललीये.
अनेक तरुणांना या कुत्ता गोळीचं व्यसन लागलंय. दारूसाठी लागणाऱ्या पैशांपेक्षा अत्यंत कमी पैशात कुत्ता गोळी मिळत असल्यानं अनेक तरुण या व्यसनाच्या आहारी गेले आहेत. अवघ्या दोन ते तीन रुपयांना ही कुत्ता गोळी मिळते. तिचं सेवन केल्यावर काही क्षणात या कुत्ता गोळीची नशा संपूर्ण अंगात भिनते. मालेगाव मधील 18 ते 30 वर्षे वयोगटातील बहुतांश तरुणाई या नशेच्या आहारी गेली असून 15 गोळ्या 36 रुपयांना मिळत असल्यानं अनेक तरुणांना या गोळीचं व्यसन लागलं आहे. कुत्ता गोळीचं खरं नाव अल्प्रलोजोम असं आहे.
या गोळीच्या अतिसेवनामुळं शरीर बधीर होऊन मानसिक संतुलनही बिघडण्याची शक्यता असते. ही कुत्ता गोळी शहरात येतेच कशी याबाबत कसून तपास केल्यावर या गोळीचं मध्यप्रदेश आणि गुजरात या नदोन राज्यांशी कनेक्शन असल्याचा प्रशासनाला संशय आहे. मध्य प्रदेश, गुजरात तसेच भिवंडी परिसरातून या गोळ्या आणल्या जातात. काहीजणांनी हरियाणामधूनही गोळ्या आणल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. या कुत्ता गोळीचा फैलाव पाहाता तरुणाईला या गोळीचं व्यसन करण्यापासून रोखणं आणि या गोळीची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करणं, असं दुहेरी आव्हान सध्या पोलीस प्रशासनासमोर उभं ठाकलं आहे.
 
                         
                                 
                             
                             
                             
                            