मुंबई : राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांना अवमानकारक शिवीगाळ केल्याप्रकरणी अब्दुल सत्तार यांना विरोधी पक्षच नाही तर स्व-पक्षातून देखील नाराजीचा सूर ऐकावा लागला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील अब्दुल सत्तार यांची चांगलीच कान उघडणी केली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिष्टमंडळासह राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना भेटून सत्तार यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी केली. महाराष्ट्रभर राष्ट्रवादीने रस्त्यावर उतरून आंदोलने देखील केली.
या प्रकरणाने आता वेगळं वळण घेतल आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते विजय शिवतारे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “आम्ही पक्षाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. अब्दुल सत्तार यांनी केलेल वक्तव्य निषेधार्थ आहे. पण हे का झालं? प्रत्येक आमदार 40-50 लाख लोकांमधून निवडून येतात. मग किती दिवस संयम ठेवणार? सुप्रिया सुळे यांच्याकडे काय पुरावे आहेत, हे त्यांनी सांगावं. अजित पवार जेव्हा पहाटे शपथविधीला गेले होते, तेव्हा किती खोके मिळाले होते ? हे त्यांनी सांगावं. चार महिने जनतेच्या समस्या बाजूला ठेवून जे राजकारण होत आहे. त्या ॲक्शनलाही रिएक्शन होती. सत्तार यांची जीभ घसरली. तर एवढा उहापोह का ? असा सवाल विजय शिवतारे यांनी यावेळी उपस्थित केला.
तर या प्रकरणी आता 50 खोके आणि बोके असं वक्तव्य करणाऱ्या अजित पवार, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांना डिफमेशनची केस पाठवली जाईल. तयार रहा, उद्या प्रक्रिया सुरू होईल. असा इशारा देखील विजय शिवतारे यांनी यावेळी दिला.