अर्थकारण : तुम्हाला माहित आहे का ? लॉकरमधील दागिन्यांचाही असतो विमा; वाचा सविस्तर प्रकिया

272 0

अर्थकारण : सध्या वाढते चोरी आणि दरोड्यांचे प्रमाण पाहता प्रत्येक घराच्या करत्या पुरुषाला आणि गृहलक्ष्मीला काळजी असते ती लॉकर मधल्या दागिन्यांची… लाखमोलांच्या दागिन्यांची सुरक्षितता हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. कपाटात आणि वॉर्डरोबमध्ये असलेल्या लॉकरमध्ये दागिने ठेवता येतात. त्याचबरोबर बँकांनी देखील लॉकर व्यवस्था सुरू केली. पण घरात किंवा बँकेत दागिने ठेवल्यानंतर त्याचा विमा देखील उतरवता येतो. अर्थात घरात आणि बँकेत दागिने ठेवण्यास बराच फरक आहे. या दोन्हीचा विमा उतरवण्याच्या नियमात बरेच अंतर आहे.

लॉकरची सुरक्षा बँकेची जबाबदारी

बँक लॉकरमधून अनमोल दागिने गहाळ होण्याचे किंवा चोरीला जाण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. बँक काहीवेळा लॉकरची जबाबदारी झटकतात. पण बँकांना जबाबदारी झटकून चालणार नाही. कारण लॉकर हे बँकेच्या हद्दीतच असते आणि त्याची सुरक्षा पाहण्याची जबाबदारी ही बँकेवरच असते. आरबीआयच्या मते, आग, चोरी, दरोडा, लुटमार, घर पडणे, बँक कर्मचार्‍यांकडून होणारी फसवणूक आदी कारणांमुळे लॉकरमधील दागिन्यांची हानी होत असेल तर बँका जबाबदारी झटकू शकत नाहीत. तरीही जबाबदारी टाळत असल्याच्या बातम्या नेहमीच ऐकावयास मिळाल्या आहेत. बँकिंग नियामकच्या गाईडलाइननुसार लॉकरमधील दागिने गायब झाल्यास बँकेकडून वार्षिक शुल्कापोटी वसूल केल्या जाणार्‍या रक्कमेच्या तब्बल शंभर पट भरपाई देणे बँकेला बंधनकारक असते. लॉकरमधील दागिन्याची हानी झाली असेल तर बँक आपली जबाबदारी झटकू शकत नाही.

लॉकरमधील दागिन्यांचा विमा
बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या दागिन्यांना विमा संरक्षण देण्याची पद्धत फार जुनी नाही. अनेक विमा कंपन्या लॉकरमधील दागिन्यांना विमा कवच देतात. सामान्यपणे विमा कंपन्यांकडून तीन ते चाळीस लाखांपर्यंत विमा कवच प्रदान केले जाते. परिस्थितीनुसार कवचमध्ये कमी जास्त फरक राहू शकतो.
विमा हमी योजनेत लॉकरचा समावेश नाही

आरबीआयकडून सुरू करण्यात आलेल्या विमा कर्ज हमी योजनेत विमा कवचच्या श्रेणीत लॉकरचा समावेश केलेला नाही. एखादी बँक बंद झाली असेल तर त्या बँकेत असलेल्या पैशाला पाच लाखांपर्यंतचे विमा संरक्षण असते. परंतु लॉकरमध्ये ठेवलेल्या दागिन्यावर कोणताही विमा नसतो. अर्थात बँक बंद पडत असेल तर खातेदारांना पत्र पाठवून लॉकर रिकामे करण्याचे सांगितले जाते.

विमा कवचमध्ये कशाचा समावेश

बँक लॉकरमध्ये असलेल्या दागिन्यांना दिल्या जाणार्‍या विमा कवचमध्ये अपघात, बँक कर्मचार्‍याकडून होणारी फसवणूक, दरोडा, जबरदस्ती हिसकावून घेणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. याशिवाय नैसगिक संकटात बँकेची इमारत कोसळली असेल आणि लॉकरमधील दागिने गायब होत असतील किंवा त्याची हानी झाली असेल तर त्यापोटी दावा करता येतो. लॉकरमधील दागिन्यांशिवाय मौल्यवान वस्तू जसे की शेअर प्रमाणपत्र, विमा पॉलिसी बाँड, पासपोर्ट, जमीनीचे कागदपत्रे आदींंना देखील विमा संरक्षण दिले जाते.

कोणत्या गोष्टीला कवच नाही

विमा पॉलिसीत विमा कंपन्यांकडून उल्लेख केलेल्या गोष्टीशिवाय अन्य कोणत्याही वस्तूला कवच दिले जात नाही. अर्थात जादा कवच मिळवण्यासाठी अतिरिक्त हप्ता देखील भरावा लातो. हे कवच रायडरच्या माध्यमातून घेता येते. मात्र यासाठी लॉकरधारकास बँकेशी चर्चा करावी लागेल.

विमा करार रद्द करण्याची सुविधा

एखादा व्यक्ती लॉकरच्या सुरक्षेवरून विमा पॉलिसीला काही अतिरिक्त लाभ जोडू इच्छित असेल आणि बँकेकडून त्यास नकार दिला जात असेल तर विमाधारक हा पंधरा दिवसांच्या आत नोटीस पाठवून पॉलिसी रद्द करण्याचा अर्ज देऊ शकतो.

हप्ता कसा निश्चित होतो

विमा कवच हा लॉकरचा आकार, दागिन्यांचे मूल्य आणि लॉकरचे भाडे यावर ठरविले जाते. यानुसार विम्यासाठी वार्षिक हप्ता द्यावा लागतो. म्हणजे आपल्याला पॉलिसीचे दरवर्षी नुतनीकरण करावे लागते.

घरातील दागिन्याला विमा कवच

बँकेच्या लॉकरमध्ये असलेल्या मौल्यवान दागिन्यांना देखील काही कंपन्या विमा कवच प्रदान करतात. परंतु अशा प्रकारच्या विमा योजना फारशा प्रचलित नाहीत. त्याचवेळी कंपन्या घरच्या लॉकरला विमा देण्याचे टाळतात. अर्थात घरच्या विम्यात म्हणजेच होम इन्शूरन्समध्ये अशा प्रकारचे कवच मिळू शकते. घरातील दागिन्यांचा विमा उतरवण्याचे प्रमाण हे एकल कुटुंब म्हणजेच न्यूक्लिअर कुटुंबात अधिक आहे. अशा कुटुंबात पती पत्नी दोघेही नोकरी करतात आणि घराला दिवसभर कुलूप असते. त्यामुळे चोरी, दरोडा होण्याचा धोका अधिक राहतो. अशावेळी एक कुटुंबातील लोक आपल्या घरातील दागिन्यांचा विमा उतरवू शकतात.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!