निधन वार्ता : ज्येष्ठ लेखिका मृणालिनी जोशी यांचे निधन

414 0

पुणे : ज्येष्ठ लेखिका मृणालिनी जोशी यांचे गुरुवार (२७ ऑक्टोबर) रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्या 95 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. तुळशीबागवाले कॉलनीतील आपल्या निवासस्थानी दुपारी १.०० वाजण्याच्या सुमारास मृणालिनी जोशी यांनी अखेरचा श्वास घेतला.

देशभक्त, अध्यात्मिक व्यक्तींचे चरित्रलेखन व काव्यलेखन यांसाठी त्यांची ओळख होती. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रेरणेने मॄणालिनी जोशी यांनी लिखाणाला सुरवात केली. कुसुमाग्रज स्वतःच्या वाढदिवसाला दरवर्षी एक नवी कविता लिहून मृणालिनी जोशी यांना पाठवत असत.

तसेच पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांच्या त्या अनुग्रहित शिष्या होत्या. संत तुकारामांच्या पत्नी जिजाई यांच्या जीवनावरील आनंदाचे डोही आनंद तरंग आणि समर्थ रामदासांच्या शिष्या संत वेणाबाई यांच्या जीवनावरील वेणास्वामी या कादंबऱ्या, चांगदेव पासष्टीचे अभंगावरील रसाळ भाषेतील निरूपण असलेले स्वस्तिश्री हे पुस्तक हे त्यांचे अन्य साहित्यही प्रसिद्ध आहे. जीवनात भेटलेल्या संत-महंतांच्या सहवासातील आठवणींवर आधारित ‘आलोक’ हे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक त्यांनी लिहिले आहे.

मृणालिनी जोशी अल्प परिचय

मृणालिनी जोशी यांचा जन्म १३ फेब्रुवारी १९२७ रोजी रत्नागिरी येथे झाला. रत्नागिरी येथे स्वा. सावरकर यांचे घर शेजारीच असल्याने लहानपणापासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध होते. स्वा. सावरकर त्यांना मुलगी मानत असत. शहीद भगतसिंग यांच्या जीवनावरील ‘इन्किलाब’, रा. स्व. संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरुजी यांच्या जीवनावरील ‘राष्ट्राय स्वाहा’, शंकर महाराज यांच्या जीवनावरील ‘शंकरलीला’, पावसचे स्वामी स्वरूपानंद यांच्या जीवनावरील ‘अमॄतसिद्धी’, स्वा. सावरकर यांच्या जीवनातील अंतिम कालखंडावरील कादंबरी ‘अवध्य मी! अजिंक्य मी!!’ या त्यांच्या विशेष गाजलेल्या कादंबऱ्या होत.

‘इन्किलाब’ या कादंबरीचे हिंदी, इंग्रजी व गुजराथी या भाषांमध्ये तर ‘राष्ट्राय स्वाहा’ या कादंबरीचे हिंदी व तेलुगू भाषेत अनुवाद झाले आहेत. चिन्मय मिशनचे संस्थापक स्वामी चिन्मयानंद, आचार्य रजनीश ‘ओशो’, दत्तोपंत ठेंगडी, बाळासाहेब देवरस, अटल बिहारी वाजपेयी व जगन्नाथराव जोशी अश्या अनेक मोठ्या व्यक्तींचा त्यांना सहवास लाभला होता. ज्योतिष शास्त्राचीही त्यांना आवड होती. त्यांना २००६ साली डॉ. वि.रा. करंदीकर यांच्या हस्ते स्नेहांजली पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!